Narayan Rane Arrest: 'राणेंची तब्येत ठीक नाही, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज', तपासणीनंतर डॉक्टरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 04:28 PM2021-08-24T16:28:44+5:302021-08-24T16:30:02+5:30
Narayan Rane Arrest: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.
Narayan Rane Arrest: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. राणेंना पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी डॉक्टरांच्या एका पथकानं त्यांच्या आरोग्याची तपासणी केली होती. राणेंची तब्येत ठीक नसल्याची माहिती आता समोर आली आहे. तशी माहितीच राणेंच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
राणेंच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. "नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना शूगर आहे आणि त्यांचं ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांची शूगर तपासायची होती पण ती तपासता आलेली नाही. पण त्याचं ब्लडप्रेशर जास्त आढळून आलं आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे", असं राणेंच्या आरोग्याची तपासणी केलेल्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी राणेंची तपासणी केल्यानंतरही पोलिसांनी राणेंना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत आता पोलीस कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.