शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचे सिद्ध करून दाखवा, आपण राजकीय संन्यास घेऊ - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 02:11 PM2018-02-09T14:11:26+5:302018-02-09T14:16:16+5:30
'माझ्यावर कितीही केसेस होऊ दे, पण जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणारच आणि तुमच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन', असा शब्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला
राजापूर : 'माझ्यावर कितीही केसेस होऊ दे, पण जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणारच आणि तुमच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन', असा शब्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला. तालुक्यातील नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर उपस्थित होते.
यावेळी राणे पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांची मस्ती कोकणात खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे त्यांनी या वादात न पडलेलेच बरे. कोकणी माणसाने शिवसेना घडवली. मात्र, उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेला काय दिले? खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी एकतरी प्रकल्प आणला आहे काय? असा सवाल करून राजन साळवी यांना तर मीच घडवले, ते काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचे सिध्द करून दाखवा, आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान देऊन ते पुढे म्हणाले की, हा प्रकल्प मोदी अन् शहांनी आणला, असे विनायक राऊत सांगतात. पण नाणार कुठे आहे हे त्यांना माहीत आहे का? मुख्यमंत्र्यांनी तर विधिमंडळात सांगितले की, हा प्रकल्प आंध्रप्रदेशमध्ये जात होता, तो याच विनायक राऊत यांनी आणला. याचवेळी त्यांनी शिवसेनेला एकाच व्यासपीठावर समोरासमोर घेण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास कदम यांचा प्रकल्पाला विरोध असेल, तर या प्रकल्पाला पर्यावरण दाखला कोणी दिला? असा सवाल राणे यांनी केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आपण काँग्रेसचा तांत्रिक आमदार असलो तरी राणेंचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांना खडसावले
यावेळी नारायण राणे यांनी नोटीस बजावणाऱ्या प्रांताधिकारी अभय करंगुटकर यांना सोडणार नाही. आपण माझ्या कक्षेत आलात. आता तुमच्या जमिनी, मालमत्ता यांची चौकशी लावू, असे ठणकावतानाच नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धेंडे यांना गडचिरोली वा बॉर्डरवर पाठवणार आहोत, असे सांगितले. महिलांविरोधात गुन्हे दाखल कराल, तर डोळे जाग्यावर ठेवणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.