'नारायण राणे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बोलण्याइतकी दीपक केसरकरांची उंची नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 04:32 PM2022-07-15T16:32:31+5:302022-07-15T16:35:14+5:30

मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार केसरांवर दिलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी म्हणजे लहान तोंडी मोठा घास देण्यासारखा आहे.

Narayan Rane is a national leader, Deepak Kesarkar is not tall enough to talk about him | 'नारायण राणे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बोलण्याइतकी दीपक केसरकरांची उंची नाही'

'नारायण राणे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बोलण्याइतकी दीपक केसरकरांची उंची नाही'

googlenewsNext

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये, हे सांगण्याइतपत आमदार दीपक केसरकर यांची उंची नाही. उगाच नाही तेथे तोंड खुपसू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्यात केसरकरांच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

 यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते. परब म्हणाले, संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याने शिवसेना संपवली.  त्याचप्रमाणे भविष्यात केसरकर हे मुख्यमंत्री शिंदे यांना महाग पडतील. त्यामुळे राणेंवर बोलल्यास आम्ही गप्प बसणार नाही, तसेच भविष्यात काहीही झाले तरी आम्ही केसरकरांशी जुळवून घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका परब यांनी यावेळी मांडली.

ते पुढे म्हणाले की, युती असली तरीही वरिष्ठ नेत्यांना आमचे म्हणणे पटवून देऊ, मनधरणी करू पण आगामी पालिका निवडणुकीत ताकदीने उतरून वीसही जागा निवडून आणू, असा विश्वास ही परब यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, नारायण राणे यांच्याकडे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका व जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रे आहेत. मात्र, स्वतःला जिल्ह्याचा नेता समजणाऱ्या केसरकर यांच्याकडे साधी शहरातील नगरपालिकाही नाही. त्यामुळे गल्लीतील नेते असलेल्या केसरकरांनी गल्लीतच बोलावे. उगाच दिल्लीत जाऊन मोठ्या गमजा मारू नये. बंडानंतर जिल्ह्यात परतलेल्या केसरकरांसोबत साधे २० कार्यकर्तेही नव्हते. त्यामुळे आता त्यांनीच काय ते ठरवावे, असे ही परब म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार केसरांवर दिलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी म्हणजे लहान तोंडी मोठा घास देण्यासारखा आहे.  केसरकर हे आग लावत सुटले असून, मोठमोठ्या नेत्यांवर बोलून आपली किंमत वाढवत आहेत. केसरकर उद्या शिंदे यांनाही धोकादायक ठरतील, अशी भीतीही व्यक्त केली. कधीच स्वतःच्या जिवावर मोठे न झालेले केसरकर यांचा राजकीय इतिहास हा आयत्या बिळावर नागोबा असाच राहिला आहे. ते एक नंबर संधिसाधू राजकारणी आहेत, अशी टीकाही यावेळी परब यांनी केली.

Web Title: Narayan Rane is a national leader, Deepak Kesarkar is not tall enough to talk about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.