सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का
By मनोज मुळ्ये | Published: May 9, 2024 04:39 PM2024-05-09T16:39:45+5:302024-05-09T16:42:57+5:30
आता प्रतीक्षा निकालाची, तोपर्यंत चर्चांना वेग
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : दीड महिना सुरू असलेली राजकीय धामधूम मंगळवारी मतदानानंतर संपली असली तरी निकालासाठी आणखी पाऊण महिना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार, कोण हरणार अशा चर्चांना ऊत आला आहे. जिल्हा क्षेत्र म्हणून विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात ०.२९ टक्के मतदान कमी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.०९ टक्के इतकेच मतदान वाढले आहे. त्यातही रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सुमारे ३ टक्के मतदान कमी झाले आहे आणि कणकवलीमध्ये सुमारे २ टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेले हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याच मुद्द्यावर चर्चा फिरत आहेत.
टपाली मतदानासह एकूण मतदान ६३.२० टक्के इतके झाले आहे. गत लोकसभा निवडणुकीत ते ६१.९१ टक्के इतके होते. मतदानामध्ये प्रशासनाला प्रथम श्रेणी मिळाली असली तरी विशेष श्रेणी मिळालेली नाही. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात निरुत्साह दिसून आला. मतदार यादीतील नाव गायब झाले, केंद्र बदलले अशा काही तक्रारी होत्या. मात्र मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी बाहेर पडले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार या मतदारसंघात गतवेळेपेक्षा थोडेच मतदान अधिक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता राजापूर, कणकवली आणि सावंतवाडी या तीन मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा यावेळी मतदान वाढले आहे तर रत्नागिरी मतदारसंघात ते कमी झाले आहे.
गणिते फायद्यातोट्याची
- मतदान संपल्यापासूनच मतदानाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार फायद्यातोट्याची गणिते मांडली जात आहेत. कुणाला फायदा होणार आणी कुणाला तोटा यावर अधिक चर्चा होत आहेत.
- कणकवली मतदारसंघात आमदार भाजपचे म्हणजे महायुतीचे आहेत. त्यामुळे तेथे वाढलेले मतदान महायुतीला फायदेशीर ठरू शकते, असा ढोबळ अंदाज आहे.
- राजापूर मतदारसंघातील आमदार उद्धवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे आहेत. तेथे आघाडीला फायदा होऊ शकतो.
- या चर्चा कितीही झाल्या तर सामान्य माणसाचा अंदाज मात्र कोणताही पक्ष देऊ शकत नाही.