नारायण राणे यांच्या पाठिराख्यांची संख्या कमी होतोय?

By Admin | Published: July 19, 2014 11:38 PM2014-07-19T23:38:32+5:302014-07-19T23:50:58+5:30

एरवीची गर्दी आता गेली कोठे?

Narayan Rane's supporters are getting reduced? | नारायण राणे यांच्या पाठिराख्यांची संख्या कमी होतोय?

नारायण राणे यांच्या पाठिराख्यांची संख्या कमी होतोय?

googlenewsNext

रत्नागिरी : उद्योगमंत्री नारायण राणे मोठा राजकीय धमाका करणार आणि त्याआधी ते ‘आपल्या’ लोकांशी संवाद साधणार, अशी मोठी वातावरण निर्मिती झाली. पण या वातावरण निर्मितीचा फार मोठा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यात झाल्याचे दिसले नाही. राणे यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्यांची संख्या खूपच कमी होती. चिपळूण, रत्नागिरीच्या तुलनेत लांजा-राजापूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी अधिक गर्दी होती. जिल्ह्यातील एकूणच चित्र पाहता त्यांच्या पाठिराख्यांची संख्या मर्यादीत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्ष नेतेपद आणि वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रीपद लक्षात घेता १९९५पासून जवळपास १८-१९ वर्षे ते सत्तेत किंवा प्रमुख पदांवर राहिले आहेत. कोकणात इतके यश दुसऱ्या कोणत्याच नेत्याला मिळाले नसल्याने त्यांच्यापाठीशी असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण अलिकडच्या काळात या संख्येला मर्यादा येऊ लागली आहे.
२00५मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम केला, तेव्हा त्यांच्यावर अन्याय झाल्याचा मुद्दा मान्य करत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे त्यांच्या पाठीशी होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांच्यासमवेत काँग्रेसमध्ये गेले. रत्नागिरी जिल्ह्यात हे प्रमाण कमी असले तरी शिवसेनेत राहून राणे यांच्याबद्दल आत्मियता असलेल्यांची संख्या अधिक होती. २00९च्या लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा विजय होण्यामध्ये या आत्मियतेचा प्रभाव अधिक होता. पण आता त्यालाही मर्यादा येऊ लागल्या आहेत.
२00५ साली राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा अनेक लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तीनच वर्षात म्हणजेच २00८ साली त्यांनी काँग्रेसबाबतची आपली नाराजी उघडपणे मांडली. त्यावेळी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हाही त्यांच्या पाठीशी असलेल्यांची संख्या अधिक होती. आता मात्र या पाठिराख्यांची गर्दी कमी होऊ लागली आहे. पाच-सहा वर्षांच्या काळात ठराविक लोकच मोठे झाल्याचा आक्षेप घेत अनेक छोटे कार्यकर्ते राणे यांच्यापासून दुरावले. येत्या सोमवारी २१ रोजी राणे राजीनामा देणार, राजकीय भूकंप करणार, भूकंपापूर्वी ते आपल्या भागातील लोकांना भेटणार, शक्तीप्रदर्शन करणार, अशी मोठी हवा तयार झाली किंवा केली गेली. पण प्रत्यक्षात राणे सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा खेड, चिपळूण, रत्नागिरी याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्यांची संख्या फार मोठी नव्हती. राणे यांच्या पुढाकारातून मोठमोठी पदे मिळवणारेही त्यांच्या स्वागतासाठी हजर नव्हते. (प्रतिनिधी)
एरवीची गर्दी आता गेली कोठे?
लोकसभा निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी होणारी गर्दी यावेळी दिसली नाही. निवेदने घेऊन, मागण्या घेऊन, पक्षप्रवेशासाठी आणलेली माणसे घेऊन अनेक लोक त्यांच्या मागेपुढे धावत होते. मात्र शुक्रवारच्या त्यांच्या दौऱ्यात हे चित्र दिसले नाही. अतिशय मोजकीच माणसे हातखंबा येथे उपस्थित होती. त्यातील एका पदाधिकाऱ्याने ‘राणेसाहेब अजून आमचे नेते आहेत, म्हणून आम्ही इथे आहोत’ अशी सावध आणि बोलकी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Web Title: Narayan Rane's supporters are getting reduced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.