मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका
By मनोज मुळ्ये | Published: March 14, 2024 01:52 PM2024-03-14T13:52:49+5:302024-03-14T16:26:10+5:30
आम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती
गुहागर : गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. पण देश विकसित करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत पुढच्या निवडणुकीची तारीख देतात. दहा वर्षे ते सत्तेत आहेत, मग आतापर्यंत ते काय गवत उपटत होते का, असा प्रश्न करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे ठाकरे यांची सभा गुरुवारी झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री आणि येणा-या लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. बुधवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात आले. सकाळच्या सत्रात शृंगारतळी तर दुपारच्या सत्रात त्यांनी गुहागर येथे बैठक घेतली.
भाजपचे हिंदुत्त्व शिव्यांचे
आम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती भाजप अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती. आताची भाजप वेगळी आहे. या भाजपचे हिंदुत्त्व वेगळे आहे. आमचे हिंदुत्त्व ओव्यांचे आहे, तर या भाजपचे हिंदुत्त्व शिव्यांचे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. भाडोत्री जनता पार्टीसह भाजपचे अनेक उल्लेख त्यांनी केले.
दहा वर्षेत ते सत्तेत राहून ते काय..
देश विकसित करायचा आहे, असे ते प्रत्येक निवडणुकीत सांगतात. प्रत्येकवेळी पुढच्या निवडणुकीची तारीख देतात. आतापर्यंत दहा वर्षे ते पंतप्रधान आहेत. अजूनही देश केवळ विकसनशील असेल तर दहा वर्षेत ते सत्तेत राहून ते काय फक्त गवत उपटत आहेत का, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. भाषणाच्या सुरुवातीला ठाकरे यांनी शिवसेना सोडून गेलेल्या लोकांवर टीका केली. आपला पक्ष, बाप चोरणा-या लोकांना आपले शिवसैनिकच पराभूत करतील, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.