दापाेलीतील नारगोली धरण पूर्णत: सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:12+5:302021-07-14T04:37:12+5:30
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धरणाला गळती लागणे व धरण गळतीमुळे फुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र दापोली ...
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धरणाला गळती लागणे व धरण गळतीमुळे फुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र दापोली तालुक्यातील नारगोली धरण पूर्णत: सुरक्षित असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव शेडगे यांनी दिली.
दापोली नगरपंचायत मालकीच्या दापोली शहरामध्ये नियमित भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नारगोली येथील धरणाचे खोलीकरण लोकसहभागातून एप्रिल, मे २०१९ मध्ये करण्यात आले. या धरणाची महादेव टाेळे यांनी पाहणी केली. यावेळी लेखापाल दीपक सावंत, नळपाणी पुरवठा विभागाचे स्वप्नील महाकाळ, सरपंच प्रभाकर लाले उपस्थित होते. मागील २ वर्षे दापोली शहराची नियमित भासणारी पाणीटंचाई कमी झाली. खोलीकरणामुळे निघालेला गाळ, माती, मुरूम, खडक यापासून धरणाच्या भिंतीचे व भिंतीच्या पायाचे मजबुतीकरण करण्यात आले. यामुळे ४२ वर्षे जुन्या व दुर्लक्षित असलेल्या धरणाचे प्रथम एखाद्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने लोकसहभागातून पाणी टंचाईवर तर मात केलीच, त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण केले आहे.
कामाचे मेरी, नाशिक येथील धरण सुरक्षा संस्थेच्या पथकानेही लोकसहभागाचे कामाचे काैतुक केले आहे. लोकसहभागातून धरणातील ७८६६० क्युबिक मीटर गाळ व माती काढण्यात आली. याद्वारे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये ०.०७८ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढला आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पूर्वी ०.३५ होता, तो आता एकूण ०.४३ एमसीएम (दशलक्ष घनमीटर) झाला आहे. वाढलेल्या पाण्यामुळेच शहरामध्ये एप्रिल व मेमध्ये नियमित पाणी पुरवठा करण्यात आला.
धरणामध्ये खोलीकरण, रुंदीकरण, दगडी बंधारे, मातीची संरक्षक भिंत उभारणे, जमीन तयार करणे, ओढ्याचे रुंदीकरण, श्रमदान आदीचे अंदाजित मूल्य हे ३६९.६७ लाख होत आहे. धरणाच्या कामाकरिता नगरपंचायतीने डंपर, इंधन व इतरकरिता एकूण ३६.६३ लाख खर्च केला आहे. शासनाच्या अलोरे येथील जलसंपदा विभागाने फक्त गाळ काढण्यासाठी मे १,८३,०९,३०८ इतके अंदाजपत्रक केले होते. नगरपंचायतीने लोकसहभागातून फक्त गाळच काढला नाही, तर खोली करणे, रुंदीकरण, बंधारे व जमीन तयार केली आहे. यामुळे शासनाची सुमारे ३ कोटी इतक्या निधीची बचत केली आहे.
धरणाच्या खालील शेतकऱ्यांचे पुरामुळे होणारे नुकसान कमी झाले. तसेच नदीमध्ये बारमाही पाणी राहिल्यामुळे शेतीमध्ये दुबार पीक घेणे शक्य आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.