चिपळुणातील तीन कातभट्ट्यांवर नाशिकच्या वनविभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:50 PM2024-11-27T12:50:56+5:302024-11-27T12:51:20+5:30

खैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे

Nashik forest department raids three spinning mills in Chiplun | चिपळुणातील तीन कातभट्ट्यांवर नाशिकच्या वनविभागाचा छापा

चिपळुणातील तीन कातभट्ट्यांवर नाशिकच्या वनविभागाचा छापा

चिपळूण : नाशिकच्या हवेत खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी सकाळी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला. या छाप्यात सावर्डेतील कातभट्टी फॅक्टरीला सील ठाेकले असून, दहिवली बु. येथील फॅक्टरींच्या मालकाला नाेटीस बजावली आहे.

वन विभागाच्या पथकाने सावर्डे-कुंभारवाडी येथील सिंडिकेट फूड्स फॅक्टरीवर धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा आढळला. या कारवाईदरम्यान फॅक्टरीचे मालक विक्रांत तेटांबे तिथून पळून गेल्याचे लक्षात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावला आहे. या फॅक्टरीमधील कागदपत्रे व पुस्तके, वाहतूक पासेस, टॅबलेट पुढील चौकशी जप्त केले आहे. या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कात ज्यूस व रेडिमेड कात आढळला आहे. हा कात नाशिकच्या जंगलातील खैर लाकडापासून बनवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे.

त्यानंतर दहिवली खुर्द येथील सचिन कात फॅक्टरी व तिरुपती कात फॅक्टरी येथे धाड टाकण्यात आली. या ठिकाणीही अवैध खैरसाठा सापडला. या दोन्ही फॅक्टरीचे मालक सचिन ऊर्फ पिंट्या पाकळे हे अनुपस्थित असल्याने पुढील चौकशी करता आली नाही. येथील कर्मचाऱ्यांनी तपासकामात सहकार्य न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत वन विभागाने दिले आहेत.

विभागीय वन अधिकारी विशाल माळी, काेल्हापूरचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन व मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील, वनपाल दुसाने सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी त्यांना स्थानिक मदत केली.

चिपळूणशी धागेदाेरे

खैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे. त्यातील दाेघे उत्तर प्रदेशमधील तर उर्वरित दाेघे गुजरातचे आहेत. त्यानंतर या खैर तस्करीचे धागेदोरे दहशतवादाशी असल्याचे निष्पन्न हाेताच दहशतवादविराेधी पथकाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या तपासात खैर तस्करीचे धागेदाेरे चिपळूणशी जाेडले गेले.

Web Title: Nashik forest department raids three spinning mills in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.