शोध निबंधाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान
By admin | Published: May 12, 2016 11:15 PM2016-05-12T23:15:24+5:302016-05-12T23:29:07+5:30
सतीश लळीत यांची माहिती : कुडोपीतील पाषाणचित्रे, कलाविषयक ग्रंथात समावेश
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील पाषाण चित्रांवरील सतीश लळीत यांच्या शोध निबंधाचा समावेश 'रॉक आर्ट : रिसेंट रिसर्चेस अँड न्यु पर्स्पेक्टिव्हज’ या राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथात करण्यात आला आहे. ग्रंथाचे संपादक केरळ विद्यापीठातील पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित कुमार यांनी तसे आपल्याला कळविल्याची माहिती हौशी पुरातत्व संशोधक सतीश लळीत यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात लळीत यांनी म्हटले आहे की, डॉ. अजित कुमार हे प्रख्यात पुरातत्व शास्त्रज्ञ असून पुणे येथील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पुरातत्व शास्त्राची पदव्युत्तर पदवी आणि तंजावर विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली आहे. अनेक शोध निबंध आणि पुस्तकांचे लेखक असलेल्या डॉ. अजित कुमार यांनी भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. यशोधर मठपाल यांच्यावर दोन खंडांचा गौरवग्रंथ संपादित केला आहे. भारत आणि अन्य देशांमध्ये अलिकडच्या पाषाणकला विषयक (रॉक आर्ट) संशोधनांचा आणि शोध निबंधांचा या गौरव ग्रंथामध्ये समावेश आहे. त्यात क्युबा, पेरु, इटली आणि पाकिस्तान या चार देशांतील संशोधकांच्या आणि भारतातील १९ राज्यांमधील संशोधकांच्या शोध निबंधांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून कांतिकुमार पोवार आणि सतीश लळीत या दोघांचे शोधनिबंध निवडण्यात आले आहेत. डॉ. अजित कुमार यांनी आवर्जून संपर्क करुन शोधनिबंध मागवुन घेतला आणि त्याचा ग्रंथात समावेश केला, अशी माहिती लळीत यांनी दिली.
कुडोपी (ता. मालवण) येथील पाषाण चित्रांवरील शोधनिबंधात १४ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पाषाणकला पुन्हा एकदा मोठ्या कॅनव्हासवर आली आहे, अशी भावना लळीत यांनी व्यक्त केली आहे. हा गौरवग्रंथ ५५० पृष्ठांचा असून दोन खंडांचा आहे. नवी दिल्ली येथील न्यू भारतीय बुक कॉपोर्रेशनने हा ग्रंथ प्रकाशित केला
आहे. (प्रतिनिधी)