रत्नागिरीतून बुद्धिबळाचे राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत - प्रसन्न आंबुलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 07:13 PM2024-02-03T19:13:19+5:302024-02-03T19:13:32+5:30
भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहा वर्षे खुल्या बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या जात आहेत.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी: भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहा वर्षे खुल्या बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या जात आहेत. या खेळाला ग्लॅमर मिळवून दिले पाहिजे. रत्नागिरीतही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित कराव्यात. रत्नागिरीतून बुद्धिबळाचे राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, ही सप्रे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी केले.
केजीएन सरस्वती फाऊंडेशन व चेसमेनतर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आंबूलकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, ऋचा जोशी, सीए उमेश लोवलेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
भारताचे प्रथम राष्ट्रीय विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के जी एन सरस्वती फाऊंडेशन मार्फत आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात प्रारंभ झाला. मूळचे देवरुखचे असलेल्या कै. सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरीत २०१३ सालापासून या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रसन्न आंबूलकर व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी बुद्धिबळाच्या पटावर प्रतिकात्मक चाली करून स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून एकूण १०८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.