लाॅकडाऊनमुळे १० रोजीची राष्ट्रीय लोकअदालत स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:06+5:302021-04-08T04:31:06+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई ...
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १० एप्रिल रोजी आयोजित केलेली राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. येथील जिल्हा न्यायालय, जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील दिवाणी प्रलंबित प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, पराकाम्य दस्तऐवज अधिनियमाच्या कलम १३८ची प्रकरणे, वसुली प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे, कामगारसंबंधीचे निस्तारणीसंबंधीचे दावे, कौटुंबिक / वैवाहिक वादासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे, भूसंपादन, दिवाणी, किरकोळ दिवाणी अर्ज इत्यादी तडजोडीसाठी ठेवणेत आली होती. त्याचबरोबर या लोकअदालतीमध्ये वादपूर्व प्रकरण म्हणजे विदयुत कंपनी, विविध बँका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणेबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगर परिषद यांचे विविध विभागाचे थकीत रकमेबाबतची प्रकरणे, वाटपासंदर्भातील दाखल न झालेली प्रकरणे, जमिनीवरील अतिकमणासंदर्भातील प्रकरणे, वैवाहिक वाद ज्यासंदर्भात न्यायालयात कोणताही वाद प्रलंबित नाही, अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती.
परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. १० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशीची राष्ट्रीय लोकअदालत पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पुढील तारीख निश्चित होताच त्याची सुचना संबंधितांना देणेत येणार आहे, अशी सूचना वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आनंद सामंत यांनी केली आहे.