राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३,२४९ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:35 AM2021-09-27T04:35:16+5:302021-09-27T04:35:16+5:30
रत्नागिरी : न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित असतात. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. हे वाद निकाली ...
रत्नागिरी : न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित असतात. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. हे वाद निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या लाेकअदालतीत रत्नागिरी जिल्ह्यातून २,९८९ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १४,८९१ वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यातील ३२४९ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. यावेळी एकूण ८,५५,३७,१६० रुपये एवढ्या रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने निर्णित झाले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशावरून २५ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय लाेकअदालतीचे आयाेजन करण्यात आले हाेते.
मोठ्या संख्येने प्रकरणे विधी सेवा प्राधिकरणकडे दाखल झाल्यामुळे लोकन्यायालयापूर्वी सतत पाच दिवस पूर्वबैठकांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वबैठकांच्या दरम्यान एस. बी. कीर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी अमित वायकुळ, अथर्व देसाई, पूर्वा जोगळेकर, सिद्धी शिंदे, दिव्या लिंगायत, अवंती गुरव, आश्विनी कदम, कृपा परुळेकर, सलोनी शेडगे, रिया माने, नीलम शिंदे, जान्हवी पाटील, निरामय साळवी, तन्मय दाते यांनी सहकार्य केले.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे २९८९ एवढी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४२३ प्रकरणांमध्ये निवाडा झाला. यामध्ये २,१०,३७,३६९ रुपये एवढ्या रकमेसंदर्भात वादाचे निवारण झाले. तसेच १४,८९१ वादपूर्व प्रकरणांपैकी २,८२६ प्रकरणांमध्ये निवाडे झाले. वादपूर्व प्रकरणांमध्ये बँकांच्या कर्जवसुली प्रकरणात ५,५७,८३,३१० रुपयांची कर्ज प्रकरणे न्यायालयात वाद दाखल करण्यापूर्वीच वसुली झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि इतर प्रकरणांमध्ये ८७,१६,३८१ रुपये एवढ्या रकमेचे वाद सामोपचाराने मिटविण्यात आले.