अनेक ठिकाणचे नैसर्गिक जलस्रोत बुजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:31 AM2021-05-09T04:31:57+5:302021-05-09T04:31:57+5:30
शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून ...
शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून खऱ्या अर्थाने कडक उन्हाला सुरुवात होते. ते मार्च महिन्याच्या अखेरच्या पंधरा दिवसांत प्रखर उन्हाची तीव्रता एवढी भयानक स्वरूपाची होते की, पाण्याशिवाय शेती-भाती करपून जाते, तर तहानेने जीव व्याकूळ होतो. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील उकाड्याने पाण्याची तीव्र टंचाई भासून पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची झळ कमी झाली आहे.
विहीर, बोअरवेल याशिवाय तळी, झरे यासारखे नैसर्गिक जलस्रोत काळाच्या ओघात बुजले जात आहेत. प्रत्येक गावात एक-दोन तरी जलस्रोत असायचे; परंतु या नैसर्गिक जलस्रोतांची जी देखभाल केली जात होती ती योग्य प्रमाणात न केल्याने सद्य:स्थितीने बरेचशे जलस्रोत बुजून गेलेले दिसतात. १० वर्षांपूर्वी याच नैसर्गिक स्रोतावर शेतकरी शेती करायचे, पिण्यासाठीसुद्धा या जलस्रोतांमधून पाणी आणले जायचे; परंतु आज मात्र विविध कारणांनी हे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर बुजले गेल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाई भेडसावण्यावर होत आहे.
आज बऱ्याच ठिकाणी पाण्याची भीषणता दिसून येते. मात्र, शासकीयदृष्ट्या ती गावे, वाड्या टंचाईग्रस्तांमध्ये समावेश नसल्याने त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नाही. तेथील लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असले तरी पिण्याशिवाय इतर वापरासाठी पाणी टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर काही भाग पाण्याने संपन्न असून, होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबला पाहिजे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे.