गॅस, इंधन दर वाढीवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:22 AM2021-07-04T04:22:02+5:302021-07-04T04:22:02+5:30
चिपळूण : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दराचाही भडका उडाला आहे. वाढत्या ...
चिपळूण : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दराचाही भडका उडाला आहे. वाढत्या महागाईमुळे आक्रमक झालेल्या येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आपला रोष व्यक्त करीत निषेध केला. तहसीलदारांना निवेदन देत, पेट्रोल व गॅसच्या किमती कमी करण्याची मागणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सामान्य माणूस पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच पेट्रोल व घरगुती वापराचा स्वयंपाक गॅस दरात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे सामान्य लोकांचे कुटुंबांचे जीवनमान कोलमडले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईत भरमसाठ वाढ झाली. त्याची झळ सामान्य लोकांना बसत आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी, तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आपला रोष व्यक्त केला. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सीमा चाळके, उपाध्यक्ष सचिन पाटेकर, युवकचे शहर अध्यक्ष सिद्धेश लाड, अल्पसंख्याकचे शहर अध्यक्ष कादिर परकार, दीपक चव्हाण, सोशल मीडियाचे अध्यक्ष सचिन साडविलकर, युवकांचे सचिव अक्षय केदारी, युवती शहर अध्यक्ष जान्हवी फोडकर, राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीयश कदम आदी उपस्थित होते.
-----------------------------
गॅस, इंधन दरवाढ कमी करण्याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे चिपळूणचे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे निवेदन देण्यात आले.