Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:00 PM2024-02-15T12:00:19+5:302024-02-15T12:00:59+5:30
नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली
दापोली : महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या येथील नगरपंचायतीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना आणि भाजप असे समीकरण जुळून आल्याने ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.
दापोली नगरपंचायतीत शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र राज्यात बदललेल्या समीकरणांमुळे ठाकरे गटाची साथ सोडत, राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना आणि भाजप महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्याने दापोली नगरपंचायतीत सत्तापरिवर्तन होईल, असे सूतोवाच आमदार योगेश कदम व खासदार सुनील तटकरे यांनी केले होते. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत आला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात दापोली नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. आघाडी म्हणूनच दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीत दापोलीच्या जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली होती.
शिवसेनेने या निवडणुकीची सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवल्याने आमदार योगेश कदम यांनी आपल्याच पक्षावर नाराज होत स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभे केले होते. यामध्ये ठाकरे गटाच्या नगरसेविका ममता मोरे नगराध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीचे खालीद रखांगे उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. दोन वर्ष सत्तेत महाविकास आघाडी सत्तेत होती.
ठाकरे गटाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आहे. त्यामुळे दापोलीतही नवी समीकरणे बघायला मिळणार, अशी चर्चा अनेक दिवस सुरू होती. बुधवारी झालेल्या सभापती निवडणुकीत बांधकाम समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे (राष्ट्रवादी अजित पवार गट), पाणीपुरवठा सभापतिपदी संतोष कळकुटके (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), स्वच्छता सभापतिपदी महबूब तळघरकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), महिला बालकल्याण सभापती कृपा घाग (शिवसेना शिंदे गट) यांनी बाजी मारली आहे.
आता नगराध्यक्ष बदल
विषय समिती निवडणुकीत ठाकरे गटाला धक्का दिल्यानंतर आता नगराध्यक्ष बदलाच्या हालचालीही लवकरच केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. खासदार सुनील तटकरे आणि योगेश कदम एकत्र आल्यामुळे हे बदल लवकरच होण्याची अपेक्षा केली जात आहे.