राष्ट्रवादीचाही सभापतींवर ‘अविश्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:16+5:302021-04-14T04:28:16+5:30
दापोली : दापोली पंचायत समिती सभापती रऊफ हजवाने यांच्यावरचा अविश्वास ठराव १६ एप्रिलला नक्कीच मंजूर होईल. हा ठराव शिवसेनेच्या ...
दापोली : दापोली पंचायत समिती सभापती रऊफ हजवाने यांच्यावरचा अविश्वास ठराव १६ एप्रिलला नक्कीच मंजूर होईल. हा ठराव शिवसेनेच्या सदस्यानेच आणला असून, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. दोन्ही पक्ष मिळून हा ठराव नक्कीच जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे दापोली पंचायत समितीमधील पक्षप्रतोद मुजीब रुमाने यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती हजवाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्याच्या वल्गना करण्याऐवजी मिळालेल्या पदाचा जनतेच्या हितासाठी वापर केला असता तर बरे झाले असते. परंतु ते केवळ कुरघोड्या करत राहिल्यामुळे तालुक्याचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या सभापतींचे पितळ उघडे पाडू, राष्ट्रवादीला भ्रष्टाचार करण्यासाठी आपली अडचण होते? असल्यानेच आपल्याला दूर करण्यात येत असल्याची विधाने हजवाने यांनी केली आहेत. जर कोणी भ्रष्टाचार केला असेल, तर तो त्यांनी सिद्ध करावा. उगाच कोणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. कोणी भ्रष्टाचार केला असेल, तर ते एवढे दिवस मूग गिळून गप्प का होते? त्यात त्यांचे तर लागेबांधे नव्हते ना, असा खोचक प्रश्न रुमाने यांनी विचारला आहे.
पक्षाने सर्वांना संधी देण्याचे ठरवले होते. त्यामुळे सन्मानाने पायउतार होऊन दुसऱ्या सदस्याला संधी देण्याऐवजी पक्षावरच कुरघोडी करून पक्षाला बदनाम करण्याचे काम हजवाने यांनी केले आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का होईल, असेही ते म्हणाले.
हजवाने यांनी जरूर आमच्यावर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करावे. एकीकडे आपण राष्ट्रवादीत आहोत, असे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेच्या वळचणीला उभे राहायचे, हे त्यांचे कृत्य संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे. जर कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असेल किंवा भ्रष्टाचार केला असेल तर पुरावे द्या, त्यावर योग्य कारवाई होईल. परंतु उगाच वायफळ बडबड करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.