राष्ट्रवादीने वाटली सभापतीपदाची खिरापत

By Admin | Published: September 13, 2014 11:33 PM2014-09-13T23:33:18+5:302014-09-13T23:33:18+5:30

चिपळूण पंचायत समिती : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आजच्या निवडीकडे साऱ्यांचे लक्ष

NCP feels scam of chairmanship | राष्ट्रवादीने वाटली सभापतीपदाची खिरापत

राष्ट्रवादीने वाटली सभापतीपदाची खिरापत

googlenewsNext

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी स्नेहा मेस्त्री व उपसभापती पदासाठी नंदकिशोर शिर्के यांची निवड होण्याची शक्यता आहे. रविवारी पंचायत समितीच्या छत्रपती सभागृहात तहसीलदार वृषाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यावेळी माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांना संधी न मिळाल्यास ते पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करणार आहेत.
चिपळूण पंचायत समितीच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापती पदासाठी निवड करण्यासाठी शनिवारी पाग महिला विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे, माजी पंचायत समिती सदस्य सईद खलपे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत स्नेहा मेस्त्री, समिक्षा बागवे व ऋचा म्हालिम यांना प्रत्येकी १० महिने सभापतीपद देण्याचे ठरले. मात्र, उपसभापतीपदावरुन गदारोळ झाला. माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले.
उपसभापती संतोष चव्हाण व नंदकिशोर शिर्के यांनी आपली इच्छा प्रकट केली. शिर्के व जितेंद्र चव्हाण यांना संधी देण्याबाबत एकमत होत होते. परंतु, शिर्के यांनी आपल्याला पहिली संधी मिळावी, असा आग्रह धरला. आपण ज्येष्ठ असल्याने आपल्याला प्रथम संधी मिळावी, असे माजी सभापती चव्हाण यांनी सांगितले. अखेर जिल्हा बँकेचे अध्यक्ष चोरगे यांनी आपण तिघेही भास्कर जाधव यांच्या गटाचे आहात. त्यांच्याशी संपर्क साधून निर्णय जाहीर करु असे सांगितले.
यावर जितेंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली व आपण पक्षाचा व पदाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचे होणारे परिणाम पक्षाला भोगावे लागतील. मी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. त्यामुळे आपण माझा विचार करावा असे त्यांनी सूचविले. या निर्णयावर एकमत न झाल्याने रविवारी सकाळी उपसभापती पदाबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, यामुळे रविवारी होणाऱ्या निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: NCP feels scam of chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.