शेकापमधून लढण्यास राष्ट्रवादीनेच सांगितले
By admin | Published: December 29, 2016 11:02 PM2016-12-29T23:02:50+5:302016-12-29T23:02:50+5:30
रमेश कदम यांचा गौप्यस्फोट: चिपळुणात शक्तीप्रदर्शन
चिपळूण : लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विजय सोपा व्हावा, यासाठी पक्षानेच आपल्याला शेकापमधून लढण्यास सांगितले. त्याबदल्यात आपल्याला आमदारकी दिली जाणार होती. परंतु, नेत्यांनी तो शब्द पाळला नाही. माझे व माझ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करुन अस्तित्व संपवण्यापेक्षा इतर पक्षात गेलेले काय वाईट, असा सवाल माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. मात्र कोणत्या पक्षात जाणार, याबाबत मात्र त्यांनी अजून गुप्तता पाळली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व माजी प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. गुरुवारी त्यांनी राधाताई लाड सभागृह, चिपळूण येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
ज्या राष्ट्रवादीसाठी मी अहोरात्र झपाट्याने काम केले, ज्या पक्षाची पाळेमुळे तळागाळात घट्ट रोवली, त्या पक्षाकडून झालेला अन्याय किती सहन करणार? त्यामुळे आता यापुढे त्यांच्याकडून (आमदार भास्कर जाधव) पक्ष वाढवून घ्या. आपण जो पक्ष निवडू त्या पक्षात तुम्ही माझ्यासोबत असाल. मी जेथे जाईन तेथे प्रामाणिक राहीन. या पक्षातही प्रामाणिक होतो. परंतु, आपण जेथे जाऊ तेथे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही माजी आमदार कदम यांनी केले. (प्रतिनिधी)