शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी चे आव्हान ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:01 AM2018-03-19T00:01:35+5:302018-03-19T00:01:35+5:30
प्रकाश वराडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडले आहे. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जिल्ह्यात आतापासूनच घुमू लागले आहेत. जिल्ह्यावरील सेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण अशा तीन जागांवर विजय मिळाला होता. दापोली व गुहागर या दोन्ही मतदारसंघांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने कब्जा केला होता. दापोलीची जागा सेनानेते अनंत गीते व रामदास कदम यांच्यातील राजकीय हेवे-दाव्यांमुळे सेनेच्या हातून गेल्यावेळी निसटली. तेथे राष्टÑवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली. रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत , चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण व राजापूरमध्ये राजन साळवी यांनी सेनेचे गड त्यावेळी राखले.
विधानसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा सेनेच्या विजयासाठी एकमेकांचे विरोधक असलेले गीते-रामदास कदम एकत्र आले आहेत. उत्तर रत्नागिरीत त्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रत्नागिरी व लांजा - राजापूर हे मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आधी समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी राजापूरची विधानसभा जागा धोक्यात येईल, हे लक्षात आल्याने यु टर्न घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प लादल्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा यु टर्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित कालावधीसाठी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
दुसरीकडे गुहागर व दापोली हे मतदारसंघ राखण्याबरोबरच चिपळूण मतदारसंघही ताब्यात घेण्याचा चंग राष्टÑवादी कॉँग्रेसने बांधला आहे. रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघात सेनेची वीण घट्ट बांधली आहे. तरीही येथे भाजपकडून प्रसाद लाड किंवा अन्य तगडा उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीचे राजकारण रंगले आहे.
भाजपच्या रणनीतीवर लक्ष
जिल्ह्यात भाजप कमकुवत असला तरी राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजप नेमकी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच २०१९ची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.