राष्ट्रवादी काँग्रेसचे महामार्गावर वृक्षारोपण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:04+5:302021-06-27T04:21:04+5:30
लांजा : मुंबई - गोवा महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन राष्ट्रवादी काँग्रेसने ...
लांजा
: मुंबई - गोवा महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी अनोखे आंदोलन गेले.
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे पर्यायी काढण्यात आलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून चिखलयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी तसेच वाहनचालकांचे अपघात होत आहेत. लांजातील राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन लवकरात - लवकर खड्डे भरण्यात यावेत, अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा दिला होता. दिनांक २५ जून रोजी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार समाधान गायकवाड यांनी महामार्ग ठेकेदारासोबत बैठक घेऊन सदर अडचणीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ठेकेदाराकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने वृक्षारोपण आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतली. त्यानुसार शनिवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील गोडावूनसमोर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन केले.
येत्या आठ दिवसांमध्ये खड्डे भरण्यात आले नाहीत तर दि. ६ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस अभिजित राजेशिर्के, तालुका खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, युवक शहराध्यक्ष दीपक शेट्ये, लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष लहू कांबळे व पदाधिकारी, दाजी गडहिरे, अनिकेत शेट्ये, सोहेल घारे, शाहरूख नेवरेकर, प्रणय साळवी, प्रवीण हेगिष्टे, मंगेश बापेरकर, रमेश आग्रे, सुभाष दुड्ये, श्रीकांत साळवी, संदीप शेट्ये यांच्यासह नागरिकही उपस्थित होते. या आंदोलनाला लांजा तालुक्यातील संभाजी ब्रिगेड, लांजा तालुका रिक्षा चालक मालक संघटना, शिवरायांचे मावळे, लांजा लाकूड व्यापारी संघटना, व्यापारी संघटना भाजी व फळ विक्रेते संघटना, मुस्लिम वेल्फेअर संघटना व लांजा तालुका बौद्धजन मंडळ अशा अनेक संघटना तसेच काही व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला होता.
आंदोलनाकडेही दर्लक्ष
रस्त्यावरील खड्ड्यांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसने महामार्गावर केलेल्या वृक्षारोपण आंदोलनाकडेही संबधित अधिकारी, ठेकेदाराने पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.