रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात मानेच्या कॅन्सरवर झाले उपचार, अडीच तास चालली शस्त्रक्रिया
By शोभना कांबळे | Published: October 19, 2023 06:56 PM2023-10-19T18:56:09+5:302023-10-19T18:56:24+5:30
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात डाॅक्टरांच्या टीमने अडीच तासांच्या अथक परिश्रमाने मेंदुशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्यांच्या बाजुला, मानेला झालेल्या ...
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात डाॅक्टरांच्या टीमने अडीच तासांच्या अथक परिश्रमाने मेंदुशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्यांच्या बाजुला, मानेला झालेल्या कॅन्सरवर अवघड शस्त्रक्रिया करून रूग्णाला जीवदान दिले. जिल्हा रूग्णालयाच्या २५ वर्षांच्या कालावधीत अशी क्लीष्ट शस्त्रक्रिया प्रथमच झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ असतानाही हे रूग्णालय दिवसरात्र सामान्य रूग्णांना आरोग्य सेवा देत आहे. जिल्हाभरातून या रूग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपलब्ध साधनसामुग्री आणि कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगली आरोग्यसेवा देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. या धडपडीतूनच एका रुग्णाच्या मानेला झालेल्या कर्करोगाची (कॅन्सरची) अतिशय अवघड आणि किचकट शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालया करण्यात आली.
रत्नागिरीतील या ३० वर्षाच्या तरुणाला मानेचा कॅन्सर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते. मानेला ज्या ठिकाणी हा कॅन्सर दिसून झाला तेथूनच मेंदूशी संपर्क असलेल्या रक्तवाहिन्या जातात. त्यामुळे यात जराही हलगर्जीपणा झाला असता तर रुग्णाच्या जीवावर बेतले असते.
मात्र ही अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात करण्याचा धाडसी निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला. रुग्णालयातील अद्ययावत ऑपरेशन थिएटरमध्येच ही शस्त्रक्रिया बुधवारी सकाळी सुरू झाली. यामध्ये अॅन्को सर्जन डॉ. पालेकर, सर्जन ओंकार वेदक आणि डॉ. संघमित्रा फुले या तिघांनी मेंदूशी संपर्क येणाऱ्या रक्तवाहिन्यांना धक्का न लावता ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
जिल्हा रुग्णालयात असलेल्या चांगल्या सुविधा आणि उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना अधिकाधीक चांगली सेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न असतो. गेल्या ३० वर्षांपासून या रूग्णालयात अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या कायम आहे. तरीही कोरोनाच्या संकटात जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या रूग्णालयाने दिवसरात्र सेवा दिली. यात डाॅ. फुले यांच्यासह अनेक डाॅक्टर तसेच कर्मचारी कोरोनाबाधित झाले असतानाही रूग्ण सेवा सुरूच होती.
परंतु सध्या या रूग्णालयातील किरकोळ गोष्टींवरून या रूग्णालयाला लक्ष्य केले जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष न देता रूग्णालयाचे डाॅक्टर्स आणि सर्व कर्मचारी परिश्रमपूर्वक काम करीत आहेत.
जिल्हा रुग्णालयात मानेला झालेल्या कॅन्सरवरील शस्त्रक्रिया ही अतिशय क्लीष्ट अशी शस्त्रक्रिया होती. मात्र, अतिशय जोखीम पत्करून अथक प्रयत्नाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. माझ्या कार्यकालातील ही पहिलीच शस्त्रक्रिया म्हणायला हवी. - डॉ. संघमित्रा फुले -गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी