वाढत्या रूग्णांसाठी बेडची गरज वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:30 AM2021-04-15T04:30:10+5:302021-04-15T04:30:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना रूग्णांसाठी १,८८१ बेड्स असून, १,६२८ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना रूग्णांसाठी १,८८१ बेड्स असून, १,६२८ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता, बेड्सची संख्या आणखी वाढविण्याची वेळ येणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड सेंटर करण्यात आले आहे. गुहागर, दापोलीमध्येही अन्य केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील १,८८१पैकी ४४१ बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे. जिल्ह्यात सध्या १५० कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर असून, ९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आरोग्य विभागाकडून ऑक्सिजन बेड कमी पडणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येत असून, तोही लवकरच सुरु होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३,६२१ झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये दिवसाला ३००पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. त्यातच लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा रुग्णांना कोरोना केअर सेंटर्स तसेच गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
जिल्ह्यात खासगी व सरकारी मिळून १९ कोरोना रुग्णालये असून, १६ कोरोना केअर सेंटर्स आहेत. जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालये मिळून एकूण १,८८१ बेड्स आहेत. त्यापैकी ४४१ ऑक्सिजन बेड्स, १,३२३ साधे बेड्स, ११५ आयसीयू बेड्स आहेत. आयसीयूमध्ये ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनवर १५० रुग्ण असून, २९१ ऑक्सिजन बेडस् शिल्लक आहेत. त्यामुळे अजून तरी जिल्ह्याला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवलेला नाही. मात्र, रोज नव्याने आढळणारे रुग्ण लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १०९ व्हेंटिलेटर्स
जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सची संख्या १०९ असून, सध्या केवळ ९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच जिल्ह्यात १३ डायलेसिस युनिट असून, रत्नागिरीतील उद्यमनगर येथील महिला रुग्णालयामध्येही कोरोना रुग्णांसाठी डायलेसिस युनिट सुरु करण्यात आले आहे.
...........................
जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त असली, तरी सध्या ऑक्सिजन बेड्स पुरेसे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येत असून, लवकरच तो सुरु करण्यात येणार आहे.
- डॉ. संघमित्रा फुले-गावडे
जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी.