सहकार्य, सामंजस्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:54+5:302021-06-24T04:21:54+5:30

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ ...

The need for cooperation, harmony | सहकार्य, सामंजस्याची आवश्यकता

सहकार्य, सामंजस्याची आवश्यकता

Next

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. साहजिकच गर्दी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र नाहक बाहेर पडणारे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर फिरणारे वाहनधारक कमी झालेले नाहीत. यावर कारवाई म्हणून दंड करून महसूल वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यामागचे कारण नागरिकांनी घरात थांबणे हेच होते; परंतु अनेक महाभागांनी दंड भरला, परंतु शासकीय नियमावलीचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आजही चालत्या गाडीवरून थुंकणे, रस्त्यावर उभे राहून थुंकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याचा विचार केला तर थुंकण्याची सवय नक्कीच मोडता येईल. आवश्यकता नसताना बाहेर पडून, कोण काय करणार आहे, असा खोटा आविर्भाव दाखविण्यापेक्षा थोडेसे सामंजस्य राखले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी करण्यास आपलाही हातभार लागेल.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा असो वा सुरक्षिततेसाठी झटणारी पोलीस यंत्रणा असो; जिल्ह्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन यंत्रणा अहोरात्र धडपडत आहे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. उद्योग, व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेकांचे रोजगार बुडाल्याने कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही आस्थापनांनी कामगारांना कामावर तर ठेवले आहे; परंतु वेतनाचा पत्ता नाही, तर कित्येकांचे वेतन निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च, कर्ज व त्यांचे हप्ते परतफेड, आदी विविध प्रश्नांनी बेजार मंडळी डिप्रेशनमध्ये आहेत. वास्तविक समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनाचे पडसाद भोगावे लागत आहेत. कित्येक परदेशी भारतीयांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत. गतवर्षीपासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना सर्वांनी शासनाची नियमावली अवलंबली तर नक्कीच कोरोनारूपी संकट पळवून लावणे शक्य होईल. नाहक कायद्याचे उल्लंघन करण्यापेक्षा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविणे योग्य राहील. सर्वांनी जर प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी होऊन व्यवहारांची गाडी रुळांवर येण्यास मदत होईल. निव्वळ स्वार्थ किंवा फाजील आत्मविश्वास बाळगण्यापेक्षा सहकार्य व सामंजस्य राखणे नेहमीच चांगले !

Web Title: The need for cooperation, harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.