पूरमुक्त राजापूरसाठी विकासात्मक दृष्टिकाेनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:12+5:302021-07-17T04:25:12+5:30

विनाेद पवार राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना ...

The need for a developmental vision for a flood-free Rajapur | पूरमुक्त राजापूरसाठी विकासात्मक दृष्टिकाेनाची गरज

पूरमुक्त राजापूरसाठी विकासात्मक दृष्टिकाेनाची गरज

Next

विनाेद पवार

राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळा पूर येतो आणि राजापूरकरांची तारांबळ उडते. एकेकाळी ऐतिहासिक बंदर असलेल्या आणि भलीमोठी गलबते लागणाऱ्या राजापूर बंदराच्या झालेल्या या अवस्थेत बदल घडवून आणण्याची इच्छा व दूरदृष्टीच राजापुरातील लोकप्रतिनिधींकडे नसल्याने दरवर्षीच राजापूरकरांच्या डोक्यावर अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रांमध्ये साचलेला गाळ उपसल्यास भविष्यात निश्चितच राजापूरवासीयांवरील पुराची टांगती तलवार काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूर हा राजापूरवासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राजापूर शहराला या पुराच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी १९८३ साली पूररेषा आखण्यात आली. तर शहरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसन धोरण आखण्यात आले. या धोरणाप्रमाणे पूररेषेतील बांधकामांना काही निर्बंध घालण्यात आले. मात्र, काही पूरग्रस्तांना मिळालेले भूखंड वगळता आज ३८ वर्षांनंतर समस्या जैसे थे आहे. राजापुरात दरवर्षी येणारा हा पूर राजापूरच्या विकासातील प्रमुख अडसर ठरत आहे. प्रशासनाने पूररेषा आखून आपले काम केले. त्यानंतर पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, त्यातही अनेक खरे पूरग्रस्त आजही भूखंंडापासून वंचित राहिले आहेत.

तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी आपल्या कारकिर्दीत या पूरसमस्येवर उपाय म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नदीपात्रातील गाळ काही अंशी काढण्यात आला. मात्र, त्यानंतर पूरसमस्येबाबत कोणताही विचार शासन वा लोकप्रतिनिधींकडून न झाल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे.

--------------------

गेल्या काही वर्षांत नव्याने झालेले धरण प्रकल्प, शहर विकासाच्या दृष्टीने नव्याने बांधलेले पूल आणि चौपदरीकरणात अर्जुना नदीवरील पूल आणि भविष्यात कोदवली नदीवर होणारे सुमारे १० कोटी खर्चाचे नवे धरण या गोष्टी राजापूरच्या मूळ पूरसमस्येत नव्याने भर घालणाऱ्या ठरणार आहेत. शहराच्या उशाला पूर्वेला असलेला करक पांगरी अर्जुना धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. या धरणाला प्रस्तावित असलेले कालवेच न काढल्याने धरणातील अतिरिक्त पाणी हे अर्जुना नदीमार्गेच खाडीला मिळत होते. त्यामुळे पुराची तीव्रता वाढण्यास या धरणाच्या पाण्याचाही हातभार असल्याची चर्चा आहे.

-----------------------------------

राजापूर शहर हे अर्जुना आणि कोदवली नदीच्या संगमावर वसलेले आहे. या ठिकाणी या दोन्ही नद्या जैतापूर खाडीला मिळतात. पावसाळ्यात अनेकदा समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे दोन्ही नद्यांचे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरते. तर अर्जुना नदीवर चिंचबांध आणि कोेंढेतड जोडणारा नवीन पूल, मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणासाठी बांधला जाणारा पूल यामुळे नदीपात्राचे पाणी ज्या वेगाने वाहून जाणे आवश्यक आहे, त्यालाच अडसर निर्माण हाेत आहे.

Web Title: The need for a developmental vision for a flood-free Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.