Ratnagiri News: ताण तणावाच्या जीवनशैलीत योगाची नितांत गरज : जिल्हाधिकारी
By मनोज मुळ्ये | Published: June 21, 2023 12:20 PM2023-06-21T12:20:47+5:302023-06-21T12:22:14+5:30
तटरक्षक दलातर्फे विमानतळावरच योग शिबिराचे आयोजन
रत्नागिरी : आजच्या बदलत्या ताण-तणावच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी जास्मिन, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर उपस्थित होते.
अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी केली एक तास योगासने
जिल्हाधिकारी म्हणाले की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योगा करणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित योगा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी, कर्मचारी आणि शाळांमधील विद्यार्थी यांनी एक तास योगासने केली.
तटरक्षक दलातर्फे विमानतळावरच योग शिबिराचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रत्नागिरीमध्ये भारतीय तटरक्षक दलातर्फे विमानतळावरच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील बेस कॅम्पवर उत्तम नियोजन करण्यात आले होते. यात तटरक्षक दलाचे अधिकारी आणि शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.