कोकणचे नाव अबाधित राखण्यासाठी नाट्यगृहाची गरज
By admin | Published: August 30, 2016 10:52 PM2016-08-30T22:52:19+5:302016-08-30T23:51:51+5:30
गंगाराम गवाणकर : देवगड येथील केळकर महाविद्यालयात नाट्यशाखेचे उद्घाटन
देवगड : मराठी नाट्य चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी कोकणचे नाव उज्ज्वल केले आहे. हे नाव अबाधित राखण्यासाठी कोकणात नाट्यगृहाची गरज असून या नाट्यशाखेकडून ही गरज पूरी केली जाईल. नाटक हे माझे गोत्र व रंगमंच ही माझी कुलदेवता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेल २०१६-१७ चे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या देवगड कॉलेज नाट्यशाखेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
शिक्षण विकास मंडळ, देवगडच्या वतीने देवगड महाविद्यालयातील १९७५ साली सुरू करण्यात आलेली नाट्यशाखा पुनरूज्जीवित करण्यात आली. या नाट्यशाखेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी देवगड महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात गोवा राज्याचे माजी शिक्षणमंत्री व माजी प्राचार्य गोपाळराव मयेकर तसेच अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिक्षण विकास मंडळ देवगडचे अध्यक्ष जनार्दन तेली, सभापती तृप्ती पारकर, कार्यवाह प्रसाद पारकर, सहकार्यवाह प्रमोद नलावडे, संचालक वैभव बिडये, विश्वमित्र खडपकर, साक्षी महाडिक, अॅड. अमित जामसंडेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गोपाळराव मयेकर म्हणाले की, शिवधनुष्य उचलणे कठीण असते, परंतु, या शिवधनुष्याचा इंद्रधनुष्य होतो तेव्हा मनाला वेगळा आनंंद प्राप्त होतो. अशा प्रकारेच आपल्याकडून हा इंद्रधनुष्य तयार झालेला आहे. जगताना केवळ माणसाला पैसा पुरेसा नाही तर त्या सोबत आनंदही गरजेचा असतो. देवगडमध्ये मी प्राचार्यपदी हजर झालो तेव्हा मनोरंजनाचे काही साधन नव्हते. तसेच या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे देवगड एस. टी. स्टँड या ठीकाणी ‘एक शाम, रफिक के नाम’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला.
त्यानंतर १९७५ साली महाविद्यालयात नाट्यशाखा सुरू केली. मनोरंजनाबरोबरच येथील गरजू विद्यार्थ्यांना व संस्थेला आर्थिक मदतीचा हातभार द्यावा हा त्यामागे उद्देश होता. तसेच सांस्कृतिक चळवळीपेक्षा माणसाला संस्कृती शिकवता यावी की, ज्यात माणसाच्या मन, बुध्दी व संवेदनाचा अंतर्भाव असावा, अशी भावना होती. यामुळे देवगड शिक्षण विकास मंडळाच्या तांत्रिक विकास शाखेचे संचालक अॅड. अमित जामसंडेकर यांची महाविद्यालयाच्या विकासातील जडत्व दूर करण्याची धडपड ही नक्कीच स्वागतार्ह असल्याचे मयेकर यांनी यावेळी सांगितले. या नाट्यशाखेकडून भरविण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धेसाठी देण्यात येणारा फिरता करंडक रवींद्र मयेकर यांच्या नावे देण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या सूचनेचा संस्था व देवगड नाट्यशाखेच्यावतीने स्वीकार झाल्याची घोषणा संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद नलावडे यांनी यावेळी केली. जनार्दन तेली यांनी मयेकर यांना मानद प्राचार्य पद स्वीकारण्याची विनंती केली. माजी प्राचार्य मयेकर यांनीही या विनंतीचा स्वीकार करत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन गिरीष भिडे व सोनल उतेकर यांनी केले. आभार सोनल उतेकर हिने मानले. (प्रतिनिधी)