किल्ले, जलदुर्गांचे संवर्धन होणे काळाची गरज
By admin | Published: February 22, 2015 10:50 PM2015-02-22T22:50:40+5:302015-02-23T00:21:03+5:30
सत्येंद्र राजे : निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक
चिपळूण : कोकणच्या विकासामध्ये किल्ले, जलदुर्ग, लेणी, पर्यटन स्थळे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. येथील शेती सध्या धोक्यात आली आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत किल्ले व जलदुर्ग यांचे जतन, संवर्धन केल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल, असे रत्नागिरी व्हिस्टोरियनचे प्रमुख प्रा. सत्येंद्र राजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिवकालीन ऐतिहासिक गडकोट हिच छत्रपती शिवरायांची खरी स्मारके आहेत. घेरापालगड (ता. खेड), महिपतगड (ता. संगमेश्वर) आणि बाणकोट (ता. मंडणगड) किल्ला तसेच लेणी, क्रांती स्थळे यांचे जतन व संवर्धन केल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या ३ किल्ल्यांना संरक्षित स्मारक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. घेरापालगड हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी इ. स. १७२९ मध्ये जिंकला होता. घेरापालगडसह महिपतगड व बाणकोट किल्ल्यांवर बुरुज, मंदिरे, पाण्याची टाकी, तलाव, तोफा आदी अनेक अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. काळाच्या ओघात या किल्ल्यांची पडझड होऊ नये आणि पुढील काळात अनेक पिढ्यांना या प्राचीन वास्तूंमधून प्रेरणा मिळावी, यासाठी या किल्ल्यांना संरक्षित स्मारके म्हणून मंत्री तावडे यांनी मान्यता दिली असल्याने खऱ्या अर्थाने पर्यावरण व सागरी सुरक्षेचा गंभीर प्रश्न मिटेल, असा विश्वासही राजे यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक वारसा जतन व पर्यटन विकास या दृष्टीने कोकणातील जलदुर्ग व प्रमुख पर्यटनस्थळे एकमेकांना रेल्वे मार्गाने जोडणे, किल्ले जलदुर्ग, लेणी यांची डागडुजी करावी, आवश्यक तेथे सुशोभिकरण करावे, पाणी व विद्युत व्यवस्था करावी, किल्ल्यांच्या ठिकाणी शासकीय व्यवस्थापक, सुरक्षारक्षक, स्वच्छता कामगार, माळी यांची नियुक्ती करावी. किल्ल्यापर्यंत रस्ते, रोपवे आदी दर्जेदार सुविधा पुरवाव्यात. पर्यटकांसाठी किल्ल्यांवर भोजनगृह, विश्रामकक्ष, प्रथमोपचार सुविधा, किल्ल्यांवर शासकीय वस्तू भांडाराची निर्मिती करावी अथवा स्थानिक बेरोजगार तरुणांना उत्पादने विकण्यास शासनाने भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करुन द्यावी. प्रत्येक तालुक्यात किमान १ किल्ला सांस्कृतिक वारसा व पर्यटनाच्या दृष्टीने निवडून तेथे डागडूजी, सुशोभिकरण करावे. जलदुर्ग, पर्यटन व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सेवा सुविधांनी सुसज्ज करावे आदी मागण्यांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे राजे यांनी सांगितले. या भागाचा विकास करण्यासाठी पर्यटन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने अशा भागाला आता चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा राजे यांनी व्यक्त केली आहे. अशा गोष्टींसाठी इतिहासप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जिल्ह्यातील घेरापालगड (खेड), महिपतगड ( संगमेश्वर) व बाणकोट ( मंडणगड) या तीन किल्ल्यांच्या डागडुजीचा विषय लक्षात घेऊन व एतिहासिक वास्तूंचे तजन व्हावे, हे गृहीत धरून या तिन्ही किल्ल्यांच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यामुळे या भागाच्या एतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किल्ले राज्यशासनाने संरक्षीत केले आहेत
सत्येंद्र राजे यांनी मांडले गडसंरक्षणासंबंधीचे विचार
सुशोभिकरण करणे गरजेचे सोबत सुरक्षितता सर्वात महत्वाची
सांस्कृतिक वारसा जतन व पर्यटन विकास महत्वाचा
इतिहासाची साक्ष