नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण: व्हिसेरा अहवाल प्राप्त, आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा
By अरुण आडिवरेकर | Published: August 12, 2023 07:00 PM2023-08-12T19:00:24+5:302023-08-12T19:03:14+5:30
मृत्यूचे कारण स्पष्ट हाेण्यासाठी पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती
रत्नागिरी : ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात हाेते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेण्यासाठी पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती. हा अहवाल शुक्रवारी (११ ऑगस्ट) पाेलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार तिच्या शरीरात काेणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दापाेली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी २९ जुलै राेजी निघाली हाेती. मात्र, तिचा १ ऑगस्ट राेजी दाभाेळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हाेती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात हाेते. मात्र, पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले हाेते. तपासात त्यांनी १०४ साक्षीदारही तपासल्याचे सांगितले हाेते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट हाेईल, असेही त्यांनी सांगितले हाेते. त्यामुळे पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पाेलिसांनी केली हाेती.
हा अहवाल शुक्रवारी पाेलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात काेठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर काेठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.