नीलिमा चव्हाण हिचा घातपात नाही, रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती
By अरुण आडिवरेकर | Published: August 8, 2023 06:44 PM2023-08-08T18:44:24+5:302023-08-08T18:44:47+5:30
व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
रत्नागिरी : ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर आजवरच्या तपासात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याबाबत माहिती अथवा तथ्ये समोर आलेली नाहीत. त्यामुळे हा घातपात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, व्हिसेरा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल, असेही त्यांनी सांगितले.
दापाेलीतील एका बॅंकेत काम करणाऱ्या ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा १ ऑगस्ट राेजी दाभाेळ खाडीत मृतदेह आढळला. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी (८ ऑगस्ट) पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. यावेळी अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित हाेत्या.
अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, २९ जुलै राेजी दापाेली येथून बेपत्ता झालेल्या नीलिमा चव्हाण हिचा मृतदेह दाभाेळ खाडीत सापडला हाेता. त्यानंतर पाेलिसांनी तिच्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. काही साक्षीदार तपासण्यात आले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार शरीरावर काेणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे समाेर आले आहे. आजवरच्या तपासावरुन तिचा घातपात झालेला नसल्याचा निष्कर्ष समाेर येत आहे. परंतु, या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने पाेलिस तपास करत असून, साक्षीदारांकडे कसून चौकशी सुरु आहे. लवकरच या मृत्यूमागील वस्तुस्थिती समाेर येईल, असे अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले की, तिचा व्हिसेरा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. हा अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चार दिवसात हा अहवाल आम्हाला प्राप्त हाेईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल, अशी माहिती त्यांनी दिली.