Neeraj Chopra: नीरज चोप्राच्या रूपात अवतरला बाप्पा, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निवासस्थानी होणार विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:09 PM2021-09-08T18:09:07+5:302021-09-08T18:10:36+5:30
Neeraj Chopra, Ganesh Mahotsav: बाप्पा कुठल्याही रूपात असला तरी तो तितकाच भावतो. गणपती बाप्पाशी प्रत्येकाचं इतकं जवळचं नातं असतं की, आपल्या आवडत्या गोष्टीत प्रत्येकाला बाप्पा दिसतो.
- मेहरून नाकाडे
रत्नागिरी : बाप्पा कुठल्याही रूपात असला तरी तो तितकाच भावतो. गणपती बाप्पाशी प्रत्येकाचं इतकं जवळचं नातं असतं की, आपल्या आवडत्या गोष्टीत प्रत्येकाला बाप्पा दिसतो. म्हणूनच ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राच्या रूपात बाप्पा पाहण्याची कल्पना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मनात आली आणि रत्नागिरीतील कलाकार आशिष संसारे याने ती प्रत्यक्षातही उतरवली. त्यातूनच साकारला आहे भालाफेक करणारा बाप्पा.
माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दरवर्षी विविध संकल्पनांवर गणेशमूर्ती साकारण्याची आवड आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतर नीरज चोप्राचे फॅन झालेल्या डाॅ. देशमुख यांनी यावर्षीचा बाप्पा नीरजच्या रूपातच असावा, असा निश्चय केला. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांना ही कल्पना सांगितली. त्यानुसार आशिष संसारे यांनी नीरजच्या रूपातील भालाफेक करताना अशी अत्यंत सुबक गणेशमूर्ती साकारली आहे.
भालाफेक करणारी ही गणेशमूर्ती १९ इंच म्हणजेच दीड फूड उंचीची आहे. शाडू मातीपासून ती बनविण्यात आली आहे. दोन पायांवर तोल सांभाळून भालाफेक करतानाची ही मूर्ती साकारणे निश्चितच आव्हानात्मक होते. डॉ. देशमुख यांच्या आग्रहामुळे ही गणेशमूर्ती साकारताना विशेष आनंद झाला. ट्रॅक व फिल्डमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजची मूर्ती साकारणे नक्कीच अभिमानास्पद असल्याचे मूर्तिकार आशिष संसारे यांनी सांगितले.
#NeerajChopra नीरज चोप्राच्या रूपात अवतरला बाप्पा pic.twitter.com/fNjftxxtRn
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
माजी कुलगुरू डॉ. देशमुख यांच्या मुंबईतील घरी जाण्यासाठी ही गणेशमूर्ती मंगळवारी रत्नागिरीतून मुंबईकडे रवाना झाली. देशमुख यांचे मित्र राहुल औरंगाबादकर हे ही गणेशमूर्ती रेल्वेतून मुंबईला घेऊन गेले. गेली सुमारे १५ वर्षे डाॅ. देशमुख यांना विविध संकल्पनांवरील गणपती साकारून घेतले आहेत. यापूर्वी त्यांनी प्रो-कबड्डी सुरू झाल्यावर उंदरांसोबत कबड्डी खेळणारा गणपती, झाडे लावताना गणपती अशा विविध रूपातील गणेशमूर्ती संसारे यांच्याकडून साकारून घेतल्या आहेत. गणेशमूर्तीप्रमाणे त्याची आरासही ते वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करीत आहेत.
आशिष संसारे हे शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार असून, त्यांचा पिढीजात गणेशमूर्ती कारखाना आहे. त्यांचे आजोबा रघुनाथ सखाराम संसारे यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वडील अशोक संसारे, काका प्रभाकर संसारे यांनी सुरू ठेवली. आता त्यांचा हा वारसा आशिष संसारे सांभाळत आहेत.