शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:03 PM2020-01-18T18:03:58+5:302020-01-18T18:05:29+5:30
राजापूर तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राजापूर : तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेले काही दिवस बिबट्याचे दोन बछडे शेजवली गावात दिसत होती. सुमारे सहा महिन्याचे हे बछडे कुणाच्या ना कुणाच्या घरात जात होती. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही बछडे शालेय विद्यार्थ्यांना दिसली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे एक बछडे पळाले होते तर दुसरे कणगीच्या बेटावर चढून बसले होते. त्यावेळी वन विभागाने त्याची सुटका केली होती.
दरम्यान, गुरुवारी शेजवलीतील विजय गुणाजी परवडे यांच्या घरात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली. त्यावेळी घरातील सर्वांनी आरडाओरड केल्यानंतर दोन्ही बछड्यांनी शेजारी असलेल्या प्रकाश महादेव मांजरे यांच्या घरानजीक असलेल्या लाकडाच्या माचाखाली आसरा घेतला होता.
ही माहिती शेजवलीचे उपसरपंच मंदार राणे यांनी राजापूर वनविभागाला दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल घाडगे वनरक्षक संजय रणधीर यासहीत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.
प्रथम माचाखाली जाऊन बसलेल्या दोन्ही बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. आता त्या दोन्ही बछड्यांना जुन्नर येथील पालन केंद्रात रवाना केले जाणार आहे, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.