ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा - आमदार शेखर निकम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 03:33 PM2023-07-10T15:33:25+5:302023-07-10T15:36:20+5:30

माझा स्वार्थ हाच माझ्या मतदार संघातील रखडलेली कामासाठी निधी मिळावा आणि हाच स्वार्थ मी स्पष्ट केला ही माझी चूक आहे का?

Neither fear of ED, nor expectation of ministership says MLA Shekhar Nikam | ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा - आमदार शेखर निकम 

ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा - आमदार शेखर निकम 

googlenewsNext

चिपळूण : साहेब, हे माझे दैवत आहे आणि अजित पवारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. मागच्या वेळी हाच प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी आपल्याला चर्चा करायला वेळ मिळाला होता. आपण अनेकांजवळ चर्चा केली होती. मात्र, अडीच वर्षांनी पुन्हा वेळ आली, तेव्हा कोणाजवळ ही चर्चा करायला संधी मिळाली नाही. साऱ्या घडामोडी वेगाने घडल्या. आपण अजित पवार यांना शब्द दिला होता, अशी स्पष्ट भूमिका चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मांडली.

आमदार निकम यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी सावर्डे (ता. चिपळूण) येथे रविवारी (९ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला तालुकाध्यक्ष जयंद्रथ खाताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी सभापती शौकत मुकादम, विजय गुजर, इम्रान कोंडकरी, खालिद दाभोळकर, नूर बिजले, नाझीम अफवारे, रमेश राणे, पांडुरंग माळी, धनगर समाजाचे नेते विलास खरात, जे. के. शिंदे, विश्वास सुर्वे, परशुराम खरात, मधुकर इंदुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी माजी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी निकम यांना पाठिंबा जाहीर केला.

आमदार निकम म्हणाले की, तिवरे धरण फुटले तेव्हा त्या भागात विकासाचे अनेक प्रश्न उभे ठाकले होते. चिपळूण शहर महापुराने उद्ध्वस्त केले होते. शहर पुन्हा उभे राहिल की नाही अनेक उद्ध्वस्त कुटुंब पुन्हा उभी राहतील काय असे अनेक प्रश्न असताना अजित पवार यांनी खंबीर पाठबळ दिले. चिपळूण बचाव समितीला गाळ काढण्यासाठी २० कोटी रुपये दिले. आजही मला लोकांपेक्षा आमदारकी अधिक नाही. तेव्हाच मी राजीनामा देत होतो. मात्र, तेव्हा अजित पवार यांनी माझा शब्द पाळला आणि तातडीने गाळासाठी निधी मंजूर केला. मी स्वार्थासाठी गेलो असे म्हटले याचा विपर्यास केला गेला, असे निकम म्हणाले. यावेळी ‘निकम सर आगे बडो, हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणा देत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले.

ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा

मला ईडीची भीती नाही, पदाची आणि मंत्रिपदाची अपेक्षा नाही. नव्हे तर मी नकोच सांगितले. माझा स्वार्थ हाच माझ्या मतदार संघातील रखडलेली कामासाठी निधी मिळावा आणि हाच स्वार्थ मी स्पष्ट केला ही माझी चूक आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.

Web Title: Neither fear of ED, nor expectation of ministership says MLA Shekhar Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.