मामाच्या खुनप्रकरणी भाच्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 03:22 PM2021-07-15T15:22:34+5:302021-07-15T15:23:39+5:30
Court Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथे जुलै २०१७ मध्ये मामाचा त्याच्याच भाच्याने खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. याप्रकरणी भाचा विनोद बाबा सकपाळ (३४, रा. कळकवणे ) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
चिपळूण : तालुक्यातील कळकवणे येथे जुलै २०१७ मध्ये मामाचा त्याच्याच भाच्याने खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. याप्रकरणी भाचा विनोद बाबा सकपाळ (३४, रा. कळकवणे ) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
तालुक्यातील कादवड येथील जगन्नाथ बाबू चव्हाण (७०) हे आपल्या भाच्याकडे कळकवणे येथे राहण्यासाठी गेले होते. अशातच विनोद सकपाळ याने त्यांना मारहाण केली होती. त्याने हा प्रकार आपल्या मित्रालाही सांगितला होता. त्यानंतर त्याने २ जुलै २०१७ रोजी जगन्नाथ चव्हाण यांना पुन्हा मारहाण करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने त्यांना रिक्षाने कादवड येथे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी अलोरे येथील स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तसेच या प्रकरणी विनोद सकपाळ याचा मित्र, रिक्षा व्यावसायिक यांच्यासह बारा साक्षीदार होते. विनोद सकपाळ हा खुनशी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मुमीन यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याशिवाय १० हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिने कारावास होणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी मयताच्यावतीने बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जाधव यांनी काम पाहिले.