Ratnagiri: लांजात मामीचा खून करून भाच्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:34 IST2024-12-09T11:33:43+5:302024-12-09T11:34:03+5:30
लांजा : मामीचा गळा दाबून खून करून स्वत: विषारी औषध प्राशन केल्याची घटना लांजा तालुक्यातील इंदवटी येथे शनिवारी सकाळी ...

Ratnagiri: लांजात मामीचा खून करून भाच्याचा आत्महत्येचा प्रयत्न
लांजा : मामीचा गळा दाबून खून करून स्वत: विषारी औषध प्राशन केल्याची घटना लांजा तालुक्यातील इंदवटी येथे शनिवारी सकाळी उघडकीला आली. राखी पलाश माेंडल (३३, रा. बेलमथपार, पश्चिम बंगाल) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिचा भाचा निताई संजय मंडल (३१) याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी बळीराम हरिमाेहन कबीराज (४३, मूळ रा. बगुला, पश्चिम बंगाल, सध्या रा. वैभव वसाहत, लांजा) यांनी दिली आहे. बळीराम कबीराज हे मुकादम असून, त्यांच्याकडे राखी माेंडल व निताई मंडल दोघे काम करीत होती. कबीराज हे कोर्ले येथील रस्त्याचे काम संपवून सर्व कामगारांना घेऊन इंदवटी येथे संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. त्याच ठिकाणी झोपड्या उभारून कामगार राहत होते. राखी व निताई हे दाेघेही येथेच राहत हाेते.
दरम्यान, शनिवारी सकाळी ९ वाजता दोघेही कामाला न आल्याने ठेकेदाराचा मुलगा हरिमोहन कबीराज त्यांना पाहण्यासाठी गेला. त्यावेळी राखी माेंडल या निपचित पडलेल्या दिसल्या. तर निताई हा बाजूलाच तडफडत हाेता. त्याला तातडीने उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले.
शवविच्छेदनानंतर राखी माेंडल यांचा गळा आवळ्याने मृत्यू झाल्याचे समाेर आले. याप्रकरणी निताई याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, नासीर नावळेकर, प्रियांका कांबळे, दिनेश आखाडे, राजेंद्र कांबळे, चालक नाना डोर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
राखी माेंडल यांच्या खुनानंतर निताई मंडल याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत. त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही.