Ratnagiri: चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या पोलिसांच्या जाळ्यात

By संदीप बांद्रे | Published: February 28, 2024 07:34 PM2024-02-28T19:34:23+5:302024-02-28T19:34:47+5:30

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या प्रकाश हरचिलकर अखेर चार दिवसानंतर मंगळवारी पोलिसांच्या ...

Nephew who absconded after murdering his cousin is in the police net in chiplun | Ratnagiri: चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या पोलिसांच्या जाळ्यात

Ratnagiri: चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या पोलिसांच्या जाळ्यात

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे चुलतीचा खून करुन फरार झालेला पुतण्या प्रकाश हरचिलकर अखेर चार दिवसानंतर मंगळवारी पोलिसांच्या कचाट्यात सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला लोटे एमआयडीसी आवाशी दाभीळ फाटा परिसरातून ताब्यात घेत अटक केली. दरम्यान, पोलिसांना बघून पळत असलेला प्रकाश पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  

प्रकाश गणपत हरचिलकर (49, वालोपे- चिपळूण) असे अटक केलेल्या खूनी पुतण्याचे नाव आहे. वारकरी असलेल्या लक्ष्मी हरचिलकर या पंढरपूर येथील वारी करुन वालोपे येथे त्याच्या राहत्या घरी आल्या होत्या. असे असताना 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शेतकामासाठी लक्ष्मी हरचिलकर गेल्या होत्या. यावेळी पुतण्या प्रकाश हरचिलकर याने एकटे गाठून जमीन वादाच्या रागाने त्यांच्या लक्ष्मी यांच्या डोक्यात खिळा मारुन त्यांचा खून केला. शिवाय या घटनेतील क्रूरता म्हणजे खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने शेतामध्येच लक्ष्मी यांचा मृतदेह टायरसह पेंढा टाकून जाळला. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गेलेल्या लक्ष्मी हरचिलकर दुपार २ वाजले तरी घरी न परतल्याने त्यांच्या शोधासाठी मुलगा विनोद हरचिलकर हे शेतात आले असता हा खूनाचा प्रकार उघडकीस आला.  

या घटनेनंतर पुतण्या प्रकाश हा दुचाकीवरुन वालोपे येथून पसार झाला होता. प्रकाश याच्या शोधासाठी चिपळूण पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे, वृषाल शेटकर, पोलीस नाईक संदिप माणके, पोलीस कॉन्स्टेबल  कृष्णा दराडे, गणेश पडवी आदींच्या पथकाकडून तपास सुरु असताना यावेळी परिसराती सीसीटिव्ही फुटेज तपासले जात होते. असे असताना खूनाच्या घटनेनंतर गायब झालेला प्रकाश चार दिवस होऊनही तो न सापडल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले होते. असे असताना प्रकाश याला पकडण्यासाठी रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेकडून देखील तपास सुरु होता. यावेळी स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेला प्रकाश खेड तालुक्यातील आवाशी-दाभीळ फाटा परिसरात फिरत असल्याची गोपिनिय माहिती मिळाली होती. 

त्यानुसार या शाखेने या परिसरात सापळा रचला. यावेळी प्रकाश हा महामार्गावर दुचाकी ठेवून पळत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या कट्यावरुन उडी  मारताना त्याचक्षणी त्याला गुन्हे अन्वेषष शाखेने पकडेले. प्रकाश पळत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच प्रकाश याची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल एस.आर झोरे, एन.पी.डोमणे, बी.आर. पालकर, विवेक रसाळ, पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे आदीच्या पथकाने केली.

Web Title: Nephew who absconded after murdering his cousin is in the police net in chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.