बायोगॅस प्रकल्पाचा नवा फासा
By admin | Published: May 14, 2016 11:45 PM2016-05-14T23:45:02+5:302016-05-14T23:45:02+5:30
रत्नागिरी नगर परिषद : चार महिन्यांपूर्वीच्या घोषणेचे झाले काय?
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
रत्नागिरी शहरात घनकचरा प्रकल्पाचे तीनतेरा वाजल्यानंतर कचरा समस्येला बायोगॅस प्रकल्पाचा उतारा देण्याची घोषणा जानेवारी २०१६ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचे पुढे काय झाले याचा जनतेला काहीही मागमूस नाही. त्यामुळे कारभाऱ्यांनी पुन्हा एकदा बायोगॅस प्रकल्पाचा नवा ‘फासा’ टाकला आहे की काय, रत्नागिरीकरांना स्वप्न दाखवली जात आहेत काय, या चर्चेला उधाण आले आहे. घनकचरा प्रकल्पाबाबत पालिकेचे नेमके काय नियोजन आहे, त्याचा जाहीर खुलासा करण्याची मागणीही होत आहे.
रत्नागिरी शहरातील प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र बसविण्याची सक्ती करून तेथील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्याचे स्वप्न कारभाऱ्यांनी आधी दाखविले. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. हा विषय आता कारभाऱ्यांच्याही विस्मरणात गेला असल्याची स्थिती आहे. रत्नागिरीकरही ही घोषणा विसरून गेले असावेत. त्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात ५ ते ७ गुंठे जागेत छोट्या स्वरुपातील ७ घनकचरा प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्याची पाहणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकल्पांमुळे शहरातील ५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होईल व ५० टक्के कचऱ्यावर दांडेआडोम येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल, असेही सांगण्यात आले. दांडेआडोम प्रकल्प बारगळला. परंतु, प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या घोषणेचा मागमूस नाही.
कचरा समस्या त्यानंतरही ‘जैसे थे’ आहे. केवळ साळवी स्टॉप ऐवजी कोकणनगर एवढाच कचऱ्याचा प्रवास झाला आहे. घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया होण्यापर्यंतचा हा प्रवास कधी होणार? असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे.
कचरा समस्या सोडविण्यासाठी अशा घोषणांमागे घोषणा झाल्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत बायोगॅसचा उतारा देण्यात आला. या नव्या प्रस्तावानुसार उभारण्याची घोषणा झालेल्या प्रकल्पाकरिता ५ गुंठे जागा पालिका क्षेत्रातच घेतली जाईल व तेथे दररोज संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्यापैकी ५ टन कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून वीज निर्मिती करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या घोषणेलाही आता ४ महिने उलटून गेले आहेत. त्याचा प्रस्ताव तयार झाला काय, याबाबत कसलीही वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे घनकचऱ्याबाबत पालिकेची ही आणखी एक नवीन घोषणा हवेत विरली का, अशी चर्चा सुरू आहे.
पालिकेची बायोगॅस प्रकल्पाबाबतची विचाराधीन योजना नक्कीच चांगली आहे. दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यातून ओला कचरा वेगळा करून तो बायोगॅस प्रकल्पासाठी वापरण्याची संकल्पना आहे. त्यातून विजेची निर्मितीही होईल. परंतु, रत्नागिरीच्या कारभाऱ्यांना झालेय तरी काय? कचऱ्याची समस्या गेल्या १५ वर्षात का सुटली नाही. आश्वासनांचे बुडबुडे किती दिवस फोडणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.
निवडणुकीची तयारी : घनकचरा प्रकल्पाचे गांभीर्य आहे कुणाला?
पुरे झाली आश्वासने, आता घनकचरा किंवा बायोगॅस प्रकल्प राबवावा, कचऱ्याची समस्या काही प्रमाणात तरी मिटेल, असे काम करावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. निवडणुका आल्या की, घोषणा देण्यासाठी तोंडी लावण्यापुरते या प्रकल्पांबाबत बोलू नका तर प्रामाणिकपणे काम करा, अशी शहरवासीयांची भूमिका चर्चेतून पुढे येत आहे. मात्र, कारभारी, राजकारणी येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मश्गुल आहेत. आतापासूनच प्रचार सुरू झाला आहे. गटारे दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महत्वाच्या घनकचरा प्रकल्पाचे गांभीर्य कुणालाही नाही, अशी टीका शहरातून होत आहे.
कचरा जाळा आवारातच...
शहरातील कचरा नागरिकांना त्यांच्याच घराच्या आवारात वा अपार्टमेंटच्या आवारात जाळून नष्ट करण्याची अटही भविष्यात घालावी लागण्याची शक्यता आहे. कचरा सर्वांकडेच जमा होतो, त्याची जबाबदारी नागरिकांनीही उचलायला हवी, असे मतही व्यक्त होत आहे.