रिफायनरी प्रकल्प समर्थकांमध्ये नवी आशा, निवडणुकीनंतर हालचालींना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:15 PM2019-09-19T17:15:03+5:302019-09-19T17:19:28+5:30
लोकसभा निवडणुकीचा मुद्दा म्हणून राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत मांडलेली भूमिकाही आता राज्यभर गाजू लागली आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा मुद्दा म्हणून राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत मांडलेली भूमिकाही आता राज्यभर गाजू लागली आहे. लोकांना हवा असेल
तर या प्रकल्पाबाबत पुन्हा चर्चा करण्यास हरकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही आपल्या भूमिकेत बदल केला आहे. लोकांचा विरोध नसेल तर शिवसेनाही रिफायनरीला विरोध करणार नाही, असे विधान त्यांनी केल्यामुळे रिफायनरी समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार आणि परिसरातील १४ गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची अधिसूचना गतवर्षी जाहीर झाली. त्यानंतर काही महिने शांततेत गेले. अचानक त्याला विरोध सुरू झाला. शिवसेनेनेच ही अधिसूचना जाहीर केली आणि नंतर शिवसेनेनेच ग्रामस्थांच्या सोबत विरोध करायला सुरूवात केली. लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने भाजपसमोर ठेवली होती. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपने प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली.
ही घोषणा झाल्यानंतर रिफायनरी विरोधकांनी जल्लोष केला आणि रिफायनरी समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. लोकांना हवा असेल आणि ज्या जिल्ह्यात स्वागत करण्यात येईल, अशा ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केले होते. तोच धागा पकडून रिफायनरी यावी, अशी अपेक्षा असलेल्या लोकांनी प्रकल्प परिसरात फिरून ज्यांच्या जमिनी प्रकल्पक्षेत्रात येतात, अशा लोकांकडून संमत्तीपत्र गोळा करण्यास सुरूवात केली.
साडेसात हजार एकर क्षेत्रासाठीची संमत्ती समर्थकांकडे उपलब्ध झाल्यानंतर नाणार प्रकल्प हवा, अशी मागणी करणारा मोठा मोर्चा रत्नागिरीमध्ये काढण्यात आला. त्याला मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहता नाणार प्रकल्पाबाबत सरकारला पुनर्विचार करणे भाग असल्याचे चित्र दिसत होते.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहे, असे समजल्यानंतर प्रकल्प समर्थकांनी राजापूर येथे आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. त्यांची उपस्थिती, त्यांच्या घोषणा ऐकून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलेच आणि पुन्हा चर्चा करण्याची तयारीही दर्शवली. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा शिवसेनेच्या दबावामुळे केली होती, हे उघड सत्य आहे. त्यामुळे लोकांना हवा असेल तर प्रकल्प नाणारमध्येच करण्याला मुख्ममंत्रीही अनुकूलता दर्शवतील, ही अटकळ खरी ठरली.
मुख्यमंत्र्यांची ही भूमिका अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. शिवसेनेने ज्यावेळी या प्रकल्पाला विरोध करत युती पणाला लावली होती, तेव्हाची भाजप आणि आताची भाजप यात मोठा फरक आहे. ही अधिसूचना रद्द झाल्यानंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यानंतरच्या काळात अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. आता भाजपला दुखावणे शिवसेनेला तोट्याचे ठरणार आहे. त्यामुळे भाजपने रिफायनरीबाबत ताठ भूमिका घेतली तर शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. त्याचीच झलक युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेतूनही पुढे आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबत चर्चेची तयारी दाखवल्यानंतर ठाणे येथील एका कार्यक्रमात लोकांचा विरोध नसेल तर शिवसेनाही नाणारला विरोध करणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेकडून अशी मुख्यमंत्र्यांना पूरक प्रतिक्रिया येणे ही बाब रिफायनरी समर्थकांच्या आशा पल्लवीत करणारी आहे. अनेक लोकांना प्रकल्प हवाय, ही बाब अजून सरकारच्या कानावर गेली नव्हती. त्याला तितकासा जोर आला नव्हता. आता मुख्यमंत्र्यांसमोरच प्रकल्प हवाय अशी मागणी झाल्यामुळे चर्चेचे दरवाजे उघडले गेले आहेत. येत्या काही दिवसातच निवडणूक आचारसंहिता जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सद्यस्थितीत यावर कोणताही निर्णय होणार नाही. मात्र, निवडणुका संपल्यानंतर याबाबतची थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होईल, अशी आशा समर्थकांच्या मनात निर्माण झाली आहे.
चर्चेचे दरवाजे उघडण्याची शक्यता
नाणार प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, हे मी घसा फोडून सांगत होते. मात्र, तेव्हा विरोधाचे चित्र समोर आल्यामुळे प्रकल्प रद्द केला. आता समर्थनाचे चित्र बघून समाधान वाटत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत चर्चेचे दरवाजे उघडण्याची तयारी दर्शवली आहे. हा भूमिका बदल रिफायनरी समर्थकांसाठी आशादायी ठरणार आहे.
शिवसेनेची भूमिका
लोकांना हवा असेल तर शिवसेनाही नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणार नाही, अशी भूमिका युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जाहीर करणे ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेच्या पाठबळावरच प्रकल्पविरोधक अधिक आक्रमक झाले होते. आता समर्थकांची वाढती संख्या पाहून शिवसेनेनेही आपली भूमिका बदलली तर प्रकल्प समर्थकांची अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.
राणे यांची भूमिका
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. मुळात उद्योगमंत्री पद भूषवलेले नारायण राणे आजपर्यंत कधीही उद्योगांच्या विरोधात नव्हते. त्यांनी कायम उद्योगांना पाठिंबा दिला आहे. आता ते स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. भाजप रिफायनरीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे नारायण राणे हेही या प्रकल्पाला पाठिंबा देतील, अशी समर्थकांना आशा आहे.