नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:35 AM2021-09-21T04:35:42+5:302021-09-21T04:35:42+5:30
शाेभना कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नवीन रास्त दर धान्य दुकानाच्या मंजुरीचा आराखडा तयार होईपर्यंत शहरी भागात नवीन ...
शाेभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नवीन रास्त दर धान्य दुकानाच्या मंजुरीचा आराखडा तयार होईपर्यंत शहरी भागात नवीन रेशन दुकानांच्या मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ राेजी स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता ही स्थगिती उठविण्यात आल्याने जिल्ह्यात आता नवीन रेशन दुकानांना मंजुरी देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सध्या ९४६ रास्त दर धान्य दुकाने आहेत. त्यापैकी काही बंद आहेत. त्यामुळे अशा ८७ नवीन दुकानांसाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून नवीन जाहीरनामे काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही दुकाने सुरू झाल्यास ग्रामीण भागातील जनतेला अधिक सुविधा मिळणार आहे.
...............
राज्याच्या नागरी अन्न पुरवठा विभागाकडून नव्या रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही कारणास्तव बंद असलेल्या रेशन धान्य दुकानांना नव्याने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ८७ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत.
- संतोष जाधव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
......
काय आहेत अडचणी?
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एकूण ९४६ रास्त दर धान्य दुकाने आहेत. त्यापैकी ८७ दुकाने बंद आहेत.
बहुतांश दुकाने ही राजीनामा दिल्याने आतापर्यंत बंद आहेत. त्या भागातील जनतेला दुसऱ्या दुकानात जावे लागते.
जिल्ह्यात बंद असलेली ही ८७ दुकाने सुरू झाल्यास या भागातील जनतेची सोय होईल.
....................
विविध कारणांनी दुकाने बंद
बंद असलेल्या दुकानांपैकी दोन रद्द करण्यात आली असून, निलंबित आणि बडतर्फ दुकानांची संख्या प्रत्येकी दोन आहे. तसेच एका दुकानदाराचा मृत्यू झाल्याने ते सुरू करण्यासाठी जाहीरनामा काढण्यात आला आहे. उर्वरित दुकाने राजीनामा दिल्याने बंद आहेत.