कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नवा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:37+5:302021-05-08T04:33:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राने कोविड लसीकरण मोहिमेसाठीही नवीन याेजना आखली आहे़. लसीकरणासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राने कोविड लसीकरण मोहिमेसाठीही नवीन याेजना आखली आहे़. लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी आरोग्य केंद्र प्रशासनाने टोकन पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे तरुणांसह सर्वसामान्य ग्रामस्थांचा रांगेत उभे राहण्यासाठी लागणारा वेळ आणि मनस्तापही वाचला आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाच्या नियोजनाअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी लस घेण्यासाठी मोठ -मोठ्या रांगा लागत असून, गर्दी होत आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची अधिक भीती निर्माण झाली आहे. तासन् तास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडतात. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कापरे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाने उपलब्ध लसींचा पुरवठा आणि दिल्या जाणाऱ्या लस याचे नियोजन करून लाभार्थ्यांना टोकन दिले. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता आलेच, शिवाय ग्रामस्थांचा वेळ आणि होणारा त्रासही वाचला.
लसीकरणाबाबत वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना लसीकरण सत्र, किती डोस होणार, याची माहिती दिली जाते. ग्रामस्थही चांगले सहकार्य करतात. सध्या १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी आरोग्य केंद्राला १५० डोसचा पुरवठा झाला होता. त्यानुसार ती लस देण्याचे काम सुरू होते.
चिपळूण तालुक्यातील कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींना आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत टोकन दिले.