रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांचे नव्याने सर्वेक्षण : उदय सामंत
By मनोज मुळ्ये | Published: July 22, 2023 06:22 PM2023-07-22T18:22:44+5:302023-07-22T18:23:40+5:30
इर्शाळवाडीमध्ये डोंगरच अख्खा सरकला, आता याच दृष्टीकोनातून नव्याने सर्वेक्षण
रत्नागिरी : दरड कोसळण्याचा आतापर्यंतचा अनुभव म्हणजे डोंगरावरील दगड माती मोठ्या प्रमाणात खाली येते. पण रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये आलेला अनुभव खूपच वेगळा होता. तेथे डोंगरच अख्खा सरकला आहे. त्यामुळे आता याच दृष्टीकोनातून जिल्ह्यातील दरडग्रस्त ठिकाणांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल मिळेल, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर मंत्री उदय सामंत तेथे मध्यरात्रीच पोहोचले होते. तेथील मदत कार्याला दिशा देतानाच त्यांनी सर्व प्रकार जवळून पाहिला. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत जेथे कोठे दरड कोसळली, तेथे डोंगरावरील माती, दगड, झाडेझुडपे खाली आले. पण इर्शाळवाडीमध्ये डोंगरच पुढे आला आहे. अपघातग्रस्त वस्ती १५० वर्षांपूर्वीची आहे. असे आतापर्यंत कोकणात कधी झाले नव्हते. असा प्रकार इतरत्रही होऊ शकतो. त्यासाठीच आता नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण झाले आहे. तेथे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. लोकांना स्थरलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण हे सर्व आतापर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे नवाच प्रकार समोर आला आहे. अशा पद्धतीने डोंगरच हलला तर तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच आपण जिल्हाधिकारी यांना नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.