नववर्षाची सुरुवात होणार कीर्तनसंध्याच्या ‘योद्धा भारत’ आख्यानाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:41+5:302021-04-13T04:30:41+5:30
सलग नऊ वर्षे रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी कीर्तने सादर करण्यात येत आहेत. दरवर्षी वाढता प्रतिसाद लाभणाऱ्या या ...
सलग नऊ वर्षे रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारी कीर्तने सादर करण्यात येत आहेत. दरवर्षी वाढता प्रतिसाद लाभणाऱ्या या मालिकेचा दशक महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार होता. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम करणे अशक्य असल्याने देशाभिमान जागविण्यात खंड पडू नये, याकरिता ‘योद्धा भारत’ मालिकेतील पुढची कीर्तने सादर करण्यात आली. त्यासाठी रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
कीर्तनामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९७१ पर्यंत झालेल्या युद्धांचे वर्णन आणि त्यात मर्दुमकी गाजवलेल्या याेद्ध्यांची गाथा मांडण्यात आली आहे. गतवर्षी प्रत्यक्ष सादर झालेली योध्दा भारत नावाची ही कीर्तनमालिका ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे बुवांच्या वाणीतून १९४७ नंतरच्या भारतीय युद्धांची कहाणी रसिकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. सर्व कीर्तनांच्या पूर्वरंगात रामायण आणि उत्तररंगात १९४७-१९७१ कालावधीतील युद्धाच्या रोमांचक कथा सादर करण्यात आल्या आहेत.
पहिले कीर्तन गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर दि. १३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचे संस्थानांच्या विलीनीकरणासाठी केलेले विशेष प्रयत्न, दि. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी श्रीनगरवर झालेला पहिला हल्ला, त्यातील भारतीय सैनिकांचा पहिला पराक्रम, राजेंद्र्रसिंह यांचे युद्धकौशल्य, उरीचा पूल उडविण्यासाठी स्फोटकांचा प्रथम झालेला वापर, श्रीनगर विमानतळ राखायचे उद्दिष्ट, मेजर सोमनाथ शर्मा यांचे युध्दकौशल्य आदिंचे वर्णन पहिल्या दिवशीच्या कीर्तनात आहे. मालिकेतील पुढची कीर्तने दि. १७ एप्रिल, दि. २४ एप्रिल, दि. १ मे व दि. ८ मे रोजी दिसणार आहेत.
लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीत विशेष भूमिका बजावली होती. रद्द करण्यात आलेले काश्मीरविषयक ३७० कलम, नागरिकत्वाविषयीचे विचार त्यांनी व्यक्त केले आहेत. त्यांचे युध्दातील प्रत्यक्ष अनुभव ऐकण्याची संधीही रसिकांना लाभणार आहे.