रत्नागिरीत निबे कंपनी गुंतवणार हजार कोटी, उद्योग विभागाशी सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 03:52 PM2024-08-19T15:52:39+5:302024-08-19T15:53:15+5:30
रत्नागिरी : निबे कंपनी रत्नागिरीमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करीत असून, लवकरच रत्नागिरीत संरक्षणाशी निगडित माेठा प्रकल्प येणार आहे. ...
रत्नागिरी : निबे कंपनी रत्नागिरीमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करीत असून, लवकरच रत्नागिरीत संरक्षणाशी निगडित माेठा प्रकल्प येणार आहे. त्यामधून एक ते दीड हजार रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. रत्नागिरीत उद्याेग निर्मितीसाठी उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला.
रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रविवारी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेगांचे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले हाेते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी मंत्री सामंत बाेलत हाेते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हाॅईस ॲडमिरल सुनील भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कमांडर सौरभ देव उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यातूनही देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात. हजारो नोकऱ्या मिळू शकतात, त्यातून देशसेवा घडू शकते, असे ते म्हणाले. माजी सैनिकांचे देशाप्रति असणारे योगदान विसरून चालणार नाही. असे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात व्हायला हवेत, असे त्यांनी सांगितले. लवकरच रत्नागिरीत संरक्षणाशी निगडित प्रकल्प येत आहे. त्यातून १० हजार नोकऱ्या द्यायच्या आहेत. जिल्ह्यातील युवकांनी मुंबईला न जाता जिल्ह्यातील अशा प्रकल्पात सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी तर पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले.
पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करा
पोलिस भरतीमध्ये होमगार्डमधील ५ टक्के जागा असतात. पण, आपली मुले होमगार्ड व्हायला लाजतात. पण, स्थानिकांनी याचा विचार करावा. स्थानिक मुले पोलिस दलात भरती होण्यासाठी त्यांना पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियाेजनमधून निधी दिला जाईल. त्याचे नियोजन करुन पाेलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी सूचना मंत्री सामंत यांनी केली.