सांडपाण्यावर घनगाळाचे मीठ खेड तालुका : लोटे - परशुराम औद्योगिक

By admin | Published: February 14, 2016 10:08 PM2016-02-14T22:08:41+5:302016-02-15T01:19:20+5:30

वसाहतीतील समस्या जटील; कारवाई काय?

Nigam Salt on Wastewater, Khed Taluka: Lote - Parashuram Industrial | सांडपाण्यावर घनगाळाचे मीठ खेड तालुका : लोटे - परशुराम औद्योगिक

सांडपाण्यावर घनगाळाचे मीठ खेड तालुका : लोटे - परशुराम औद्योगिक

Next

आवाशी : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या जखमेवर आता उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या घनगाळाचे मीठ चोळले जात आहे. त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी अधिकच जटील होत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.
संपूर्ण रासायनिक कारखानदारी म्हणून लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीचे नाव संपूर्ण राज्यभर आहे. मात्र, स्थापनेपासूनच सातत्याने उघड्यावर सांडपाणी सोडणे, सीईटीपीतून प्रक्रिया न करताच सोडलेल्या पाण्याने जलचर मृत होणे, पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात सांडपाणी जाऊन शेत नापीक होणे, हवेतील प्रदूषणाने आरोग्य धोक्यात येणे, सुरक्षिततेचे नियम डावलल्याने कामगारांचा बळी जाणे अशा व इतर गोष्टींनी ही वसाहत सतत चर्चेत असते. मागील पंधरा दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या सीईटीपीत रासायनिक पाणी घेऊन जाणाऱ्या पाईपलाईनवरील चेंबर ओव्हर फ्लो होऊन संपूर्ण नाल्यातील रासायनिक पाणी उघड्यावर गेल्याच्या घटना दोनवेळा घडल्या. आश्चर्य म्हणजे ठिकाण एकच. ते म्हणजे रंग बनवणाऱ्या श्रेयस इंटरमिडीएट्स कंपनीलगत प्रथम घडलेल्या घटनेत ग्रामस्थांनी संबंधित कंपन्यांना विचारणा केली असता प्रथम हात वर करणाऱ्यांनी ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून कबूल केले. यामध्ये डॉ. खान केमिकल व वनवीड केमिकल या दोन कंपन्यांचा समावेश होता. मात्र, दोघांनीही याचा ठपका सीईटीपी व एमआयडीसीवर ठेवला. चार दिवसांनी प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. मात्र, त्यावर कारवाई काय झाली, याचे कुणाकडेही उत्तर नाही. ही जखम भरते न भरते तोच आता एमआयडीसीच्या ताब्यातीलच मोकळ्या असणाऱ्या योजना केमिकलसमोर रुपल इंडस्ट्रिज आणि मोप्रा कंपनीच्यामध्ये असणाऱ्या जागेवर घनगाळ, बॉयलरची राख व इतर रासायनिक कचऱ्याचे जणू काही डंपिंग ग्राऊंडच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी घनगाळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
मात्र, एमआयडीसी व एमपीसीबीचे अधिकारी सातत्याने इकडे फिरत असताना त्यांच्या ह्या गोष्टी नजरेत का बरे येत नसाव्यात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे किंवा या दोघांचीच यामध्ये भागीदारी आहे की काय? असाही संभ्रम निर्माण होत आहे. अशाच प्रकारचा घनगाळ येथील नामांकित असणाऱ्या ए. बी. मौरी या कंपनीतून कोल्हापूरकडे पाठविण्याचे काम गेले महिनाभर सुरु आहे.
मात्र, त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्य ती सुरक्षा नसल्याने तो घनगाळ परिसरातील रस्त्यांवर पडला होता. याचा त्रास अनेक दुचाकीस्वारांना झाला. त्यावेळी आवाशीतील काही ग्रामस्थांनी कंपनीला विचारणाही केली होती. मात्र, कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्यात आली. मात्र, कंपनीतील घनगाळ हा तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंटला पाठविणे बंधनकारक असताना तो कोल्हापूर येथे का पाठविला जात आहे.
याबाबत कंपनी व्यवस्थापक पाटील यांनी आमच्याकडे तशी एमपीसीबीची परवानगी असल्याचे सांगितले. यावरूनच हे सिद्ध होत आहे की, साऱ्या समस्यांना कंपन्याऐवजी एमआयडीसी व एमपीसीबी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)


विसर : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना बासनात
तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्हाभर सुरक्षा मोहीम राबवताना औद्योगिक वसाहतीत कागदाचा तुकडाही बाहेर दिसता कामा नये, असे बजावल होते. यात सर्व कारखानदार सहभागी होते. मात्र, त्यावेळी दिलेल्या वचनाचा त्यांना सोयीप्रमाणे विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


वाहनांना सुरक्षा नाही
कंपनीच्या घनगाळाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्य ती सुरक्षा नसल्याने घनगाळ रस्त्यांवर पडत आहे. त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.


रासायनिक कारखानदारी म्हणून औद्योगिक वसाहतीचे नाव.
पंधरा दिवसापूर्वी नाल्यातील रासायनिक पाणी उघड्यावर.
हात वर करणाऱ्या कंपनीसमोर ग्रामस्थांचा रूद्रावतार.
एमआयडीसी व एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

Web Title: Nigam Salt on Wastewater, Khed Taluka: Lote - Parashuram Industrial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.