आंजर्ले बीचवर ‘रात्रीस खेळ चाले’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:38+5:302021-06-06T04:23:38+5:30

दापोली : तालुक्‍यातील आंजर्ले समुद्रकिनारी महसूल विभागाने सक्‍त ताकीद देऊनही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. पहाटेच्या अंधारात हा गोरखधंदा ...

'Night Games' on Anjarle Beach ... | आंजर्ले बीचवर ‘रात्रीस खेळ चाले’...

आंजर्ले बीचवर ‘रात्रीस खेळ चाले’...

Next

दापोली : तालुक्‍यातील आंजर्ले समुद्रकिनारी महसूल विभागाने सक्‍त ताकीद देऊनही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. पहाटेच्या अंधारात हा गोरखधंदा सुरू असल्याने महसूल अधिकारीही हतबल झाले आहेत.

आंजर्ले किनारी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कासव महोत्सव आयोजित करण्यात येतो. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या माद्या मोठ्या प्रमाणात येथे अंडी घालतात. त्यातून बाहेर पडणारी पिल्ले पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याने समुद्रकिनारा धोकादायक बनत चालल्याने पर्यटन व्यवसाय व लगतच्या बागायती धोक्यात आल्या आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यावरील वाळू उपसून ती विक्री करण्याचे काम सुरू असल्याने भविष्यात येथे कासव अंडी घालायला येण्याची शक्‍यता कमी होणार आहे. यामुळे पर्यटनावर थेट परिणाम होणार असल्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

पहाटेच्या अंधारात वाळू भरून ती पंचक्रोशीत विकण्याचा मोठा गोरखधंदा सुरू आहे. एका ब्रासला दोन हजार रुपयेप्रमाणे या वाळूची विक्री सुरू आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे आंजर्ले बीचवरील वाळू दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याने येथील समुद्रकिनारा धोकादायक बनण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. जर असाच वाळू उपसा सुरू राहिला तर समुद्रकिनारा खोल होऊन तो पोहण्यासाठी धोकादायक म्हणून घोषित केला जाईल. यामुळे आंजर्ले गावातील पर्यटन कायमचे बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

-------------------

कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा

काही दिवसांपूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी आंजर्ले किनाऱ्याची पाहणी केली होती. याचा धसका घेऊन काही दिवस वाळू चोरणे बंद होते. मात्र, आता नुकत्याच झालेल्या चक्रीवादळानंतर महसूल अधिकारी पंचनाम्यांच्या कामात गुंतल्याचा फायदा घेत या वाळू चोरट्यांनी आपला गोरखधंदा पुन्हा एकदा सुरू केला आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक करत आहेत.

Web Title: 'Night Games' on Anjarle Beach ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.