रात्रीची गस्त महत्त्वाची ठरणार
By admin | Published: July 15, 2014 11:37 PM2014-07-15T23:37:33+5:302014-07-15T23:44:29+5:30
लांजा तालुका : वाढत्या चोऱ्यांचे पोलिसांपुढे आव्हान
लांजा : पावसाला सुरुवात झाली की, मुंबई - गोवा महामार्गावर असणाऱ्या दुकानांमधून चोऱ्यांचे प्रकार वाढतात. सध्या चिपळूण, खेड येथे मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना हे चोरटे आपला मोर्चा लांजाकडे वळवू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन लांजा पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये महामार्गावर असणारी दुकाने एका रात्रीत फोडण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून लांजात अशा घटना घडत आहेत. सध्या चिपळूण, खेड येथे झालेल्या चोऱ्या लक्षात घेऊन लांजा पोलिसांनी दक्ष असणे गरजेचे आहे. मागील वर्षी लांजा शहरातील १३ ते १४ दुकाने एकाच रात्रीत फोडून दुकानामधील साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. काही सामान दुकानाबाहेर फेकून दिल्याने पावसामध्ये भिजून त्याचे मोठे नुकसान झाले होते. सध्या चिपळूण, खेड येथे होत असलेल्या चोऱ्या लक्षात घेऊन खबरदारी म्हणून लांजा पोलिसांनी स्थानिक युवकांचे पथक स्थापन केले आहे. त्यांनी रात्रीच्या वेळी आपापल्या विभागात गस्त नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलिसांनीदेखील आपल्या रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसू शकतो. त्यासाठी लांजा पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने अगोदरच खबरदारी घ्यायला हवी. लांजा शहरात आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा अद्याप लांजा पोलीस छडा लाऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)