नीलेश राणेंना अटक, जामीन नाकारला
By Admin | Published: May 20, 2016 11:14 PM2016-05-20T23:14:44+5:302016-05-20T23:40:42+5:30
चिपळूण पोलिसांना शरण : न्यायालयीन कोठडी; कणकवली, रत्नागिरी, चिपळूणमधील कार्यकर्त्यांची गर्दी, प्रचंड पोलिस बंदोबस्त
चिपळूण : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे हे शुक्रवारी सकाळी चिपळूण पोलिसांसमोर शरण आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. चिपळूण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्यानंतर त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला.
नीलेश राणे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता चिपळूण पोलिस ठाण्यात एका खासगी वाहनाने आले. त्यानंतर ते पोलिसांना शरण गेले. पोलिसांनी रितसर पंचनामा करुन अटकेची कारवाई पूर्ण केली. त्यांना गुहागरचे पोलिस निरीक्षक विनित चौधरी व सहायक पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीनंतर ते पुन्हा पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हाताचे ठसे व इतर प्रक्रिया पूर्ण झाली. दुपारी २.३० नंतर त्यांना चिपळूण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रथमेश रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली आलिशान गाडी पोलिसांना तपासासाठी हवी असल्याचा मुद्दा पोलिसांनी मांडला.यावेळी राणे यांच्यावतीने अॅड. संदेश चिकणे, अॅड. नितीन केळकर व अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती रोकडे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. एन. जी. मणेर यांनी काम पाहिले.न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आल्यानंतर राणे यांच्यावतीने जामिनासाठी अर्ज देण्यात आला. या अर्जावर न्यायाधीशांनी पोलिसांचे म्हणणे मागविले. गुन्ह्यात वापरलेली गाडी व बनियन अद्याप जप्त केलेली नाही, आरोपीला जामीन झाल्यास ते संशयितांवर दबाव आणू शकतात, त्यामुळे जामीन देऊ नये, असे म्हणणे पोलिसांनी मांडले.पोलिसांतर्फे सरकारी वकील अॅड. मणेर यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आपण खेड जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात अपील करणार असल्याचे राणे यांचे वकील अॅड. केळकर यांनी सांगितले.सकाळी राणे यांना अटक झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात सकाळपासून कणकवली, रत्नागिरी व चिपळूणमधील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते. कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. पोलीस ठाणे परिसरात गर्दी करु नये. शांतता पाळावी, असा निरोप राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते पांगले. या प्रकरणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील चिपळूण पोलीस ठाण्यात हजर होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, गुहागरचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह १३ अधिकारी व १९३ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दोन आरसीसीच्या तुकड्या व दोन स्ट्रायकिंग फोर्सच्या तुकड्याही दिमतीला होत्या. शहरातील मुख्य नाक्यावर पोलीस स्टेशन परिसर, न्यायालय परिसर, कामथे उपजिल्हा रुग्णालय व आमदार भास्कर जाधव यांचे कार्यालय, संदीप सावंत राहत असलेली कृष्णकुंज इमारत आदी मोक्याच्या ठिकाणी आवश्यक तो सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)
कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही : तुषार पाटील
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी खासदार नीलेश राणे पोलिसांसमोर शरण आले आहेत. त्यांना रितसर अटक करुन पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली आहे. या प्रकरणातील आणखी एक वाहन पोलिसांना जप्त करावयाचे आहे. या प्रकरणातील पुढील तपासात काही बारीक सारीक गोष्टी आहेत. त्याचा तपास काळजीपूर्वक व्हावा म्हणून पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
त्यात विशेष असे काही नाही. तो तपासाचा एक भाग आहे. पोलिसांवर कोणताही दबाव नाही. कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. अशा प्रकारचे भरपूर राजकीय गुन्हे दाखल होत असतात. त्यामुळे यात वेगळे असे काही नसल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा
रुग्णालयात दाखल
माजी खासदार नीलेश राणे यांना रात्री ९.१५ च्या सुमारास रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील सर्जिकल वॉर्डमध्ये एका विशेष खोलीत त्यांना ठेवण्यात आले आहे. नीलेश यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच त्यांचे बंधू व आमदार नीतेश राणे तातडीने रत्नागिरीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत नीतेश हे नीलेश यांच्यासोबत होते. रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्हा कारागृहात रवानगी
जामीन अर्ज फेटाळला गेल्याने नीलेश राणे
यांची रवानगी रत्नागिरीतील जिल्हा विशेष कारागृहामध्ये करण्यात आली आहे. सायंकाळी ७.१५ वाजता चिपळूण पोलिस त्यांना घेऊन रत्नागिरीकडे रवाना झाले.