नीलेश राणेंचे आव्हान विरोधकांना की मित्रपक्षाला?, लोकसभा मतदार संघात पुन्हा एन्ट्री
By मनोज मुळ्ये | Published: November 4, 2023 05:09 PM2023-11-04T17:09:58+5:302023-11-04T17:10:57+5:30
राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते अधिक जोमाने कार्यरत झाले
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रत्नागिरीच्या जागेवरून सुरू झालेले शीतयुद्ध आता अधिकच भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मध्यंतरीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवतील, अशी अटकळ बांधली जाणारे माजी खासदार नीलेश राणे यांनी अचानक रत्नागिरीपर्यंत शक्तिप्रदर्शन केले आहे. मला कोणी अडवू शकत नाही, ही त्यांची गर्जना विरोधी गटातील ठाकरे शिवसेनेपेक्षा महायुतीतील शिवसेनेसाठी होती की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेना आणि भाजपची राज्यस्तरावर युती असली तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये कायमच शीतयुद्ध राहिले आहे. शिवसेनेकडून आपल्याला कायमच डावलले गेले आहे, समित्या वाटपात आम्हाला स्थान नाही, विकासकामे होताना आम्हाला विचारात घेतले जात नाही, आमच्या ग्रामपंचायतींमध्येच विरोधी उमेदवार उभे केले जातात, असे अनेक आक्षेप भाजपकडून याआधीपासून घेतले जात होते. त्यात मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. भाजपकडून विकासकामांबाबत यादी देण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र, ती मंजूर होण्याआधीच जिल्हाध्यक्ष बदल झाला. त्यामुळे हे काम थांबले.
भाजपचे नव्याने जिल्हाध्यक्ष झालेले राजेश सावंत गेली बरीच वर्षे राजकारणात आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. ते आधी मंत्री उदय सामंत यांचे सर्वांत जवळचे सहकारी होते. मात्र, आता त्यांच्यात अजिबात सख्य नाही. आधीच भाजपचे मंत्री सामंत यांच्याबाबाबतचे आक्षेप आणि नव्या जिल्हाध्यक्षांची भूमिका यामुळे दोन्ही पक्षांमधील युती केवळ राज्यस्तरापुरतीच राहणार असल्याचे चित्र आहे.
आधीच विविध मुद्यांवरून या दोन पक्षांमध्ये फारसे सख्य नाही. त्यात आता लोकसभा मतदारसंघाची उमेदवार हा कळीचा मुद्दा होणार आहे. उमेदवार प्रदेश स्तरावर ठरवला जाईल आणि महायुती म्हणून त्याला निवडून आणले जाईल, असे दोन्ही पक्षांच्या जिल्हा नेत्यांकडून सांगितले जात असले तरी आपापल्या उमेदवारांबाबत दोन्ही बाजूचे लोक ठाम आहेत. महायुतीच्या या वादात‘मशाल’ पेटण्याची चिन्हे अधिक आहेत.
ठाकरे सेनेकडून राऊतच
ठाकरे शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांचेच नाव सध्या तरी अंतिम आहे. निवडणुकीच्या तोंडावर एखादे मोठे पक्षांतर झाल्यास हे नाव बदलेल. अन्यथा विनायक राऊत हेच उमेदवार असतील, असे सध्याचे चित्र आहे.
शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव
शिवसेनेकडून उद्योजक किरण सामंत यांचे नाव बराच काळ चर्चेत आहे. किरण सामंत २०२२ पासून पडद्यासमोर येऊन काम करत आहेत. त्याआधी अनेक वर्षे ते पडद्यामागेच असले तरी राजकारणात सक्रिय होते. त्यांनी स्वत: आपल्या उमेदवाराबाबत कधीही कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी ते उभे राहिल्यास विजय नक्की असल्याचा दावा केला आहे. यातूनच त्यांचा कल दिसत आहे.
भाजपकडून तीन नावे?
- भाजपकडून सध्या तीन उमेदवारांची नावे प्रकर्षाने पुढे येत आहेत. या मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार यांचे नाव सर्वात आधी चर्चेत आले. या मतदारसंघात ते सातत्याने कार्यरत होते. या मतदारसंघातील त्यांचे दौरे पाहून पत्रकारांनी ते उभे राहणार का, असे विचारल्यानंतर त्यांनी त्याचा इन्कारही केला नाही आणि स्वीकारही केला नाही.
- त्यांच्या जोडीलाच रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांचे नावही चर्चेत आले आहे. बराच काळ पडद्यामागे असलेले बाळ माने आता चांगलेच क्रियाशील झाले आहेत.
- आता या मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनीही आपल्याला येथे येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असे विधान केल्यामुळे ते इच्छुक असल्याचे दिसत आहे.
नीलेश राणे यांची अचानक एंट्री
गेली अनेक महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघात नीलेश राणे अधिक कार्यरत होते. त्यामुळे ते लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवणार, अशी अटकळ बांधली जात होती. त्यात त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते अधिक जोमाने कार्यरत झाले आहेत. त्यानंतर लगेचच त्यांनी रत्नागिरीपर्यंत शक्तिप्रदर्शन करत दौरा केला. रत्नागिरीतील भाषणात त्यांनी रत्नागिरीत येण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, असे विधान केले. त्यामुळे आता राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्यांचे हे आव्हान विरोधकांना होते की मित्रपक्षाला होते, यावरच मतमतांतरे व्यक्त होत आहेत.