नीलेश राणे शुद्धीत बोलत नाहीत; विनायक राऊतांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 07:09 PM2020-09-24T19:09:31+5:302020-09-24T19:09:48+5:30
हा प्रकल्प नाणारमध्येच होईल, असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रत्नागिरी : माजी खासदार नीलेश राणे कधीही अभ्यास करून बोलत नाहीत आणि ते शुद्धीत बोलत नाहीत. रिफायनरी होणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असे प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावसभावाने नाणार परिसरात मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केली आहे आणि हा प्रकल्प करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून रिफायनरी कंपनीशी सकारात्मक बोलणी सुरू आहेत. त्यामुळे हा प्रकल्प नाणारमध्येच होईल, असे विधान माजी खासदार नीलेश राणे यांनी केले होते. त्याला खासदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देशपांडे असोत किंवा मोदी शहा असोत किंवा कोणीही भूमाफिया असोत कोणाचीही फिकीर न करता स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवले आहे. स्थानिक जनतेच्या मतांची कदर त्यांनी केली आहे. दलालांचे पेव फुटले आहे. त्यांना हा प्रकल्प हवा आहे. पण ठाकरे आपल्या शब्दापासून दूर जाणार नाहीत. हा प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असेही त्यांनी सांगितले.