नीलेश राणे उच्च न्यायालयात

By admin | Published: May 10, 2016 10:55 PM2016-05-10T22:55:42+5:302016-05-11T00:09:53+5:30

अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न : आज होणार सुनावणी; संशयितांची ओळख परेड

Nilesh Rane in High Court | नीलेश राणे उच्च न्यायालयात

नीलेश राणे उच्च न्यायालयात

Next

चिपळूण : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खेड जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केल्याने आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. चिपळूण येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींची मंगळवारी तहसीलदारांसमोर ओळख परेड झाली.चिपळूण येथे दि. २४ एप्रिलला रात्री नीलेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या घरी येऊन आपल्याला मारहाण केली व मारत मारतच मुंबईत नेले, अशी तक्रार संदीप सावंत यांनी केली आहे. याप्रकरणी मारहाण, अपहरण व दंगलचा गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण पोलिसांनी अटक केलेले तुषार पांचाळ, कुलदीप खानविलकर, मनीष सिंग, अण्णा ऊर्फ जयकुमार पिल्लई हे चार आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची मंगळवारी संदीप सावंत, त्यांची पत्नी शिवानी सावंत व मुलगा निरज सावंत यांच्यासमोर ओळख परेड झाली. चार आरोपी व तीन साक्षीदार असल्याने ओळख परेडची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. आज, बुधवारी या चारही आरोपींच्यावतीने खेड जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे. माजी खासदार राणे यांच्या जामीन अर्जावर खेड जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील विनय गांधी यांनी बाजू मांडली, तर राणे यांच्या बाजूने अ‍ॅड. बाबा परुळेकर

व अ‍ॅड. संजय बुटाला यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारी वकिलाची बाजू ग्राह्य मानून राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे राणे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. पोलिसांनी तातडीने राणे यांना अटक करण्यासंदर्भात सावध हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, राणे यांच्यावतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nilesh Rane in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.