नीलेश राणेंनी दोन चिमुकल्यांना घेतले दत्तक

By admin | Published: June 10, 2016 11:37 PM2016-06-10T23:37:07+5:302016-06-11T00:55:00+5:30

मायेचा हात : मुलाचा शिक्षणाचा, तर मुलीचा विवाह होईपर्यंतचा सर्व खर्च उचलणार

Nilesh Ranee adopted two sparrows | नीलेश राणेंनी दोन चिमुकल्यांना घेतले दत्तक

नीलेश राणेंनी दोन चिमुकल्यांना घेतले दत्तक

Next

देवरूख : वडिलांचे छत्र अचानक हरपल्यानंतर दोन चिमुकल्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना मायेचा आधार देण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे सरसावले आहेत. आठ वर्षांच्या सुजलचे संपूर्ण शिक्षण आणि दहा वर्षांच्या तनयाचे शिक्षण आणि विवाह होईपर्यंतचा सर्व खर्च नीलेश राणे उचलणार आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील सायले गावाचे सरपंच दयानंद सोनाजी कदम यांचे ३८व्या वर्षी अकाली निधन झाले. अत्यंत गरीब परिस्थितीतून झगडत मुलांचे पालन पोषण ते करत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनी कदम कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दयानंद कदम यांचे भाऊ शरद कदम, आई निर्मला कदम आणि पत्नी दिशा कदम यांचे सांत्वन केले.
यावेळी दयानंद कदम यांची दोन्ही मुलं तेथे होती. नीलेश राणे यांनी त्यांचीही विचारपूस केली आणि संपूर्ण कुटुंबाला मदतीचा हात देऊ केला. दयानंद कदम यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी घेतो, असे सांगतानाच सुजल याचा शाळेचा संपूर्ण खर्च आणि तनया हिचा शाळा व विवाह होईपर्यंतचा सर्व खर्च मी स्वत: करणार असल्याचे सांगितले. दयानंदचे कुटुंब माझे कुटुंब आहे, त्याच्या पाठीशी कायम उभे राहणार अशा शब्दांत त्यांनी कदम कुटुंबियांना आधार दिला.
गुरुवर्य अ. वि. जाधव यांच्याही कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या आकस्मिक निधानाने संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील हिरा गमावला, असे ते म्हणाले. त्यांनी जाधव यांचा मुलगा अरुण, पत्नी संगमित्रा जाधव यांची विचारपूस केली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच याच गावातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसन शंकर पांचाळ यांचेही निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला आणि विचारपूस केली.
यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासोबत दीपक सावंत, समीर खामकर, गंगाराम केसरकर, बंटी वणजु आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


कुटुंबियांना दिलासा
निधन पावलेल्या विविध ग्रामस्थांच्या कुटुंबियांचे नीलेश राणे यांनी संगमेश्वर तालुक्यातील आपल्या दौऱ्यात सांत्वन केले. सायले सरपंच दयानंद कदम यांचे अवघ्या ३८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यामुळे राणे यांनी केवळ त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असे नाही, तर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचाही निर्णय घेतला. राणे यांनी दयानंद कदम यांच्या मुलांची विचारपूस करून या मुलांच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी उचलली.

Web Title: Nilesh Ranee adopted two sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.